अपंग मुलांसाठी सांस्कृतिक व्यासपीठ हवे

By Admin | Updated: August 23, 2014 00:49 IST2014-08-23T00:37:25+5:302014-08-23T00:49:26+5:30

नजीर शेख, औरंगाबाद आपल्या शहराने रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला अनेक कलावंत दिले. शहरात सांस्कृतिक चळवळीही जोरात आहेत.

Cultural platform for disabled children | अपंग मुलांसाठी सांस्कृतिक व्यासपीठ हवे

अपंग मुलांसाठी सांस्कृतिक व्यासपीठ हवे

नजीर शेख, औरंगाबाद
आपल्या शहराने रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला अनेक कलावंत दिले. शहरात सांस्कृतिक चळवळीही जोरात आहेत. कित्येक हौशी कलावंतांचे ग्रुप्स आपली कला उत्तमप्रकारे लोकांसमोर सादर करीत असतात. या सर्व पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र, खेदाने नमूद करावीशी वाटते की, या शहरात अपंग मुला- मुलींसाठी कुठलेही सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध नाही. समाजातील हा अत्यंत दुर्लक्षित आणि उपेक्षित घटक असून, त्यांच्यासाठी येथे एखादी सांस्कृतिक कार्य करणारी संस्था असावी, असे मत लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या स्मिता शरद भोगले यांनी मांडले.
‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात स्मिता भोगले यांनी अपंगांच्या सांस्कृतिक विकासाचा मुद्दा मांडला. त्या म्हणाल्या की, अपंगांमध्ये अंधत्व, मूकबधीर, शारीरिक अपंगत्व, मतिमंदपणा आदी प्रकार आहेत. विविध प्रकारचे अपंगत्व असलेली अनेक मुले या शहरात आहेत. परंतु या मुला-मुलींच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचे विविध कार्यक्रम बसवून ते लोकांसमोर सादर होणे हा प्रकार अजिबात नाही. अशा प्रकारच्या मुला- मुलींच्या ज्या शाळा असतात, तेथे त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम जरूर होतात; परंतु ते शाळेपुरते मर्यादित राहतात. आपल्या समाजात अपंग मुलांकडे दयाबुद्धीने किंवा सहानुभूतीने बघण्याव्यतिरिक्त एक माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्याप विकसित झालेला नाही. या प्रकारातील मुले ही अत्यंत स्वाभिमानी असतात. त्यांना समाजाची दयाबुद्धी नको असते. त्यांचं मागणं असतं की, आम्हालाही तुमच्या बरोबरीने वागणूक मिळावी. ही मुले अत्यंत कुशाग्र बुद्धीची असतात. सांगितलेली व शिकविलेली कुठलीही गोष्ट ते अत्यंत लवकर आत्मसात करतात आणि आश्चर्य वाटेल अशा प्रकारचे कलागुणही त्यांच्या अंगी असतात.
अंध मुले ही, बहुधा चांगले गायक असतात. मूकबधीर मुले शास्त्रीय नृत्य करू शकतात. या मुलांमध्ये कलागुणांची देणगी ही ईश्वरदत्तच असते, असे म्हणता येईल. कारण ईश्वराने एक गोष्ट काढून घेतली असेल तर दुसरी भरभरून दिलेली असते, अशी म्हण आहे. मला असे वाटते की, या शहरात अशा मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांच्यासाठी काम करणारी सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था हवी. माझ्या माहितीप्रमाणे फक्त मुंबईला अपंग मुलांसाठी त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारी एक संस्था आहे.
प्रसिद्ध नाटककार कमलाकर सोनटक्केआणि त्यांच्या पत्नी गेली अनेक वर्षे ही संस्था चालवत आहेत. या संस्थेत मुलांकडून नाटके, नृत्यनाटिका, मिमिक्री वगैरे कलाप्रकारांचे शिक्षण देऊन बसवून घेतले जातात. इतकेच नाही तर स्टेजवर लोकांसमोर त्यांचे प्रयोगही होतात. मला अत्यंत कळकळीने म्हणावेसे वाटते की, समाजातील या अत्यंत उपेक्षित घटकांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. उद्या आपल्या औरंगाबाद शहरातून काही उत्तम गायक आणि कलावंतही निर्माण होऊ शकतील. या उपेक्षित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या सांस्कृतिक व्यासपीठाची प्रचंड मदत होणार आहे.
अपंगांसाठीच्या अशा संस्थेसाठी शासनाने जागा देऊन इमारत तयार करावी. त्यासाठी स्थानिक नेते मंडळींनी पुढाकार घ्यावा. या संस्थेला मूर्त रूप येण्यासाठी शहरातील अपंगांच्या शाळा, हौशी कलावंतांचे ग्रुप, या विषयातील तज्ज्ञ यांचे सहकार्य घ्यावे. अपंगांसाठी नि:स्वार्थ भावनेने काही लोकांनी आपला खारीचा वाटा उचलला तरी मोठे काम होईल. अपंगांच्या या केंद्रात नृत्य, नाट्य, गायन, वादन, मिमिक्री इतकेच नव्हे तर चित्रकला, मूर्तिकला, क्राफ्ट असे विविध कलाप्रकार शिकविण्याची सोय असावी. या केंद्रात मराठवाडा पातळीवर दरवर्षी विविध कलाप्रकारांनुसार महोत्सव आयोजित करावेत. जेणेकरून संपूर्ण मराठवाड्यातील अपंग मुला-मुलींचा समावेश यामध्ये होऊ शकेल. याशिवाय त्यांच्यातील वेगळ्या ‘स्कील’ चा वापर करून घेता येऊ शकेल, अशा प्रशिक्षणाचीही सोय असावी.
स्मिता शरद भोगले

Web Title: Cultural platform for disabled children