----
जिल्हा वार्षिक योजना : सुधारित मंजूर निधीनुसार नियोजनाची तयारी सुरू
----
औरंगाबाद : जिल्हा परिषदेला जिल्हा वार्षिक योजनेतून २०२०-२१ साठी १५५ कोटी ५२ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर होते. कोरोनामुळे २६ कोटी ५ लाख ५९ हजार रुपयांच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. तर यावर्षीसाठी जिल्हा परिषदेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ३४ योजनांसाठी १२९ कोटी ४३ लाख ७५ हजार रुपये सुधारित मंजूर झाले आहे. हा निधी १०० टक्के मिळणार असून, याच्या दीडपट कामे करता येणार असल्याने त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी दिली.
कोरोनामुळे सुरुवातीला जिल्हा वार्षिक योजनेच्या मंजूर अनुदानाच्या ३३ टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. त्यानुसार नियोजन करण्यात आले; मात्र त्यानंतर १०० टक्के निधी देण्यात येणार असल्याने त्या दृष्टीने योजनांच्या माध्यमातून विकास कामांच्या नियोजनाची लगबग जिल्हा परिषदेत सुरू आहे. जि. प. च्या सर्व विभागप्रमुखांच्या नियोजनासंदर्भात दोन बैठका पार पडल्या. अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी नियोजनासाठी गुरुवारी बैठकांवर बैठका घेतल्या. विविध विकास कामांत आपल्याही मतदार संघाच्या कामांचा समावेश व्हावा, यासाठीही त्यांच्याकडे सदस्यांची रीघ लागल्याचे दिसून आले. चाटे म्हणाले की, मंजूर निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी असतो. तरीही मार्चपूर्वी त्यांचा खर्च व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निधी परत जावू नये, या दृष्टीने तयारीच्या सूचना सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्या असून, लवकरच नियोजनाचे काम पूर्ण होईल.