'माझ्या विरोधात षडयंत्र', मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; 'असंतुष्ट' समन्वयकांवरही साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 01:49 PM2024-01-16T13:49:19+5:302024-01-16T13:49:46+5:30

मी 'मॅनेज' होत नाही, त्यामुळे अशा असंतुष्ट समन्वयकांना हाताशी धरून माझ्या विरोधात 'ट्रॅप' लावला जात आहे.

'Conspiracy Against Me', Manoj Jarange's Serious Allegation; 'Disgruntled' coordinators were also targeted | 'माझ्या विरोधात षडयंत्र', मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; 'असंतुष्ट' समन्वयकांवरही साधला निशाणा

'माझ्या विरोधात षडयंत्र', मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; 'असंतुष्ट' समन्वयकांवरही साधला निशाणा

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलन मुंबईत होणार आहे. अंतरवालीपासून निघणाऱ्या आरक्षण दिंडीस आता केवळ चार दिवस बाकी आहेत. मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चेनंतर सरकारचे शिष्टमंडळ आज नवीन ड्राफ्ट देणार आहे. याच दरम्यान, जरांगे यांनी आपल्या विरोधात मोठा 'ट्रॅप' लावला  जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मी 'मॅनेज' होत नसल्याने काही असंतुष्ट मराठा समन्वयक हाताशी धरून सरकार षडयंत्र आखत असल्याची खात्रीलायक माहिती असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. अधिकृत नावे आल्यास सगळे बाहेर काढतो, असा इशारा देखील जरांगे यांनी 'असंतुष्ट' समन्वयकांना दिला. ते एक वृत्तवाहिनी प्रतिनिधीसोबत संवाद साधत होते.

आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. चर्चेतून काही बदल जरांगे यांनी सुचवले. त्यानंतर नवीन ड्राफ्ट घेऊन आज आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे जरांगे यांना भेटणार आहेत. एकीकडे सरकारच्या स्तरावरुन वेगवान घडामोडी सुरू असताना दुसरीकडे जरांगे यांनी आपल्या विरोधात मोठे षडयंत्र होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रसिद्धीसाठी हापापले काही समन्वयक वेगळी भूमिका घेत आहेत. मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर , अहमदनगर, शिर्डी येथे काहीजण विनाकारण बैठक घेत आहेत. सध्या कठीण काळ असून समाजासोबत रहा, समाजाचे कल्याण करा, जातीसाठी काम करा, तुम्हाला राजकारण करायचे आहे, पण त्यासाठी समाजाचे वाटोळे करू नका. यात कोण कोण आहे ? कशासाठी हे होत आहे ? तुमच्या मागे कोणता नेता आहे ? याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. अधिकृत माहिती मिळाल्यास सर्व जाहीर करेल,असा इशारा देखील जरांगे यांनी 'असंतुष्ट' समन्वयकांना दिला. तसेच मला नेता बनायचे नाही, समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर मी हिमालयात जाईल, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी मांडली.

सर्व समाज स्वयंसेवक, विरोधकांना थेट बाहेर काढा
सध्याच्या आंदोलनाने काहींच्या दुकानदाऱ्या बंद झाल्या आहेत. मी 'मॅनेज' होत नाही, त्यामुळे अशा असंतुष्ट समन्वयकांना हाताशी धरून माझ्या विरोधात 'ट्रॅप' लावला जात आहे. एवढेच नाही तर आरक्षण दिंडीत हिंसाचार घडू शकतो. माझे समाजाला एकच सांगणे आहे. सर्व समाजच स्वयंसेवक आहे. काही मोजकी पन्नास साठ जण समाज नाहीत. वेगळी भूमिका घेणाऱ्यांना थेट बाहेर काढा, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

'सगेसोयरे'वर तोडगा निघाला- आमदार बच्चू कडू
मराठा आरक्षण आणि तोडग्याबाबत काल मुख्यमंत्री आणि माझी जवळपास चार तास बैठक झाली. यात जरांगे यांच्या मागण्या आणि सगेसोयरे या विषयावरही चर्चा झाली. बैठकीतून एक समाधानकारक तोडगा निघाला असून त्याचा ड्राफ्ट आम्ही आणला आहे. या तोडग्यामुळे जरांगे यांचे समाधान होईल, असा विश्वास बच्चू कडू यांनी जरांगे यांची आज पुन्हा भेट घेण्याच्या पूर्वी व्यक्त केला. तसेच जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी आम्ही विनंती करणार असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.

Web Title: 'Conspiracy Against Me', Manoj Jarange's Serious Allegation; 'Disgruntled' coordinators were also targeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.