अपघातात कायमस्वरूपी अपंग झालेल्या महिलेस ६२ लाख रुपये ६ टक्के व्याजासह नुकसानभरपाई
By प्रभुदास पाटोळे | Updated: December 19, 2023 15:58 IST2023-12-19T15:58:28+5:302023-12-19T15:58:52+5:30
अपघातातील गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचा दावा मंजूर

अपघातात कायमस्वरूपी अपंग झालेल्या महिलेस ६२ लाख रुपये ६ टक्के व्याजासह नुकसानभरपाई
छत्रपती संभाजीनगर : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंग झालेल्या ज्योती गणेश घोडके (२३, रा. तळेगाव, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना ट्रकचालक, मालक आणि विमा कंपनी यांनी दावा दाखल केल्याच्या तारखेपासून सयुक्तरीत्या ६२ लाख २९ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाच्या सदस्या रिचा डी. खेडेकर यांनी नुकताच दिला. या रकमेवर ६ टक्के दराने व्याज द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.
तळेगाव येथील गणेश काशीनाथ घोडके त्यांची पत्नी ज्योती यांच्यासह दुचाकीने ३० जानेवारी २०२० रोजी जळगाव- छत्रपती संभाजीनगर रस्त्याने सिल्लोडकडे जात होते. ते भवन गावाजवळ आले असता सिल्लोडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात गणेश किरकोळ, तर ज्योती गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या दोन्ही पायांवरून ट्रक गेल्यामुळे त्या कायमस्वरूपी अपंग झाल्या होत्या. नुकसानभरपाई मिळावी यासाठी ज्योती यांनी ॲड. सुनील एस. थिटे आणि ॲड. सुरेश फुके यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायाधिकरणाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरूपी अपंगत्व
सुनावणीदरम्यान वकिलांनी न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले की, अपघात झाला तेव्हा जखमी महिला २३ वर्षांची होती. ती सुदृढ होती व शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. कुटुंबात तीच कमावती होती. अपघातातील गंभीर दुखापतीमुळे तिला कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. तिची कामाची क्षमताच गेली आहे. तिला तिचे वैयक्तिक कामसुद्धा करता येत नाही. त्यासाठी तिला दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. अपघातानंतर तिच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च, शारीरिक व मानसिक त्रास, वाहतुकीचा खर्च, गंभीर दुखापतीमुळे भविष्यातही तिला वैद्यकीय उपचाराची गरज लागणार आहे. दैनंदिन कामासाठी मदतनीस म्हणून एका व्यक्तीची गरज लागणार आहे.