शहरालगतचे सहा पथकर नाके बंद
By Admin | Updated: August 19, 2014 02:16 IST2014-08-19T02:03:58+5:302014-08-19T02:16:45+5:30
औरंगाबाद : मनपाने पथकर (प्रवेश शुल्क) नाक्याचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रियेच्या हालचाली थांबविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरालगतचे सहा पथकर नाके बंद
औरंगाबाद : मनपाने पथकर (प्रवेश शुल्क) नाक्याचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रियेच्या हालचाली थांबविल्याची माहिती सूत्रांनी दिली. शासनाने पथकर वसुली रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे १५ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून शहराच्या सीमेवर असलेले सर्व ६ नाके बंद करण्यात आले आहेत.
पालिकेला यावर्षी पथकर वसुलीतून २२ कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. पथकर वसूल करणे रद्द झाले, तर ही रक्कम एलबीटीमध्ये अधिक करून वसूल करण्यात येण्याची शक्यता आहे. सहकार एजन्सी प्रा. लि. या संस्थेकडे सध्या पथकर वसुलीचे कंत्राट होते.
यावर्षी पालिकेला २२ कोटी रुपयांमध्ये ठेका द्यायचा होता. ३ कोटी रुपये पालिकेला नैसर्गिक वाढीनुसार हवे होते. २००६ पासून ३० जून २०११ पर्यंत सहकार एजन्सीकडे जकात वसुलीचा ठेका देण्यात आला होता. त्याच संस्थेला गेल्या वर्षी पथकर वसुलीचे कंत्राट देण्यात आले होते. १ आॅक्टोबर २०१३ ते ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत १७ कोटी २६ लाख रुपयांचे उत्पन्न मनपाला अपेक्षित होते. १ कोटी ९४ लाख रुपये जास्तीचे देऊन १९ कोटी २६ लाख रुपयांत सहकारला कंत्राट देण्यात आले. १ आॅक्टोबर २०१४ ते ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत मनपाला २२ कोटी रुपयांचे उत्पन्न पथकर वसुलीतून हवे होते. मात्र, आता वसुली बंद झाल्यामुळे मनपाचे ते उत्पन्न बुडणार आहे. राज्यभरात सर्व मनपा हद्दींमध्ये पथकर वसूल केला जात होता. १ हजार कोटी रुपयांच्या आसपास ते उत्पन्न होते.
शहराच्या हद्दीतून जाणारी वाहने आता मोफत ‘पास आऊट’ होणार आहेत. व्यापाऱ्यांकडे माल घेऊन येणाऱ्या वाहनांच्या नोंदीवरून एलबीटीतून पथकर वसुलीची शक्यता आहे.
पथकरातून अपेक्षित २२ कोटींचे उत्पन्न बुडणार असल्यामुळे हे उत्पन्न एलबीटीतून वसूल करण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे. शहरातील जळगाव रोड, जालना रोड, पुणे, नाशिक रोड, पैठण रोडवरील नाके बंद करण्यात आले आहेत. आस्थापना अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी सांगितले की, पथकर नाके १५ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून बंद झाले आहेत.