चिनी कलावंतांना भारतीय नृत्याची भुरळ

By Admin | Updated: January 6, 2015 01:12 IST2015-01-06T00:45:11+5:302015-01-06T01:12:09+5:30

औरंगाबाद : शहरातील नृत्य-गुरुकुल महागामीस बीजिंग डान्स अकॅडमीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट दिली.

Chinese actresses love the Indian dance | चिनी कलावंतांना भारतीय नृत्याची भुरळ

चिनी कलावंतांना भारतीय नृत्याची भुरळ


औरंगाबाद : शहरातील नृत्य-गुरुकुल महागामीस बीजिंग डान्स अकॅडमीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट दिली. यावेळी भारतीय नृत्यसंगीत अन् ओडिसी, कथ्थक नृत्याच्या सादरीकरणाने चिनी कलावंतांना भुरळ पाडली. भारतीय नृत्यकलांचे सौंदर्य शिष्टमंडळातील कलावंतांना आकर्षित करून गेले.
बीजिंग डान्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय समन्वयक संचालक जँग पिंग, अकॅडमीच्या वरिष्ठ नृत्य शिक्षिका ज्यू ली आणि झँग जिंग यांनी महागामीस भेट दिली. आॅक्टोबरमध्ये चीन सरकारच्या सहकार्याने झालेल्या समारंभात महागामीसह जगभरातील २५ नृत्य अकादमींना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी महागामीच्या संघाने सादरीकरण केले होते. यानंतर भारतीय नृत्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी दोन्ही देशांतील नृत्यकला, संस्कृतीचे आदानप्रदान होण्याच्या दृष्टीने चीनमधील या पथकाने महागामीस भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
त्यानुसार त्यांनी सोमवारी महागामीस भेट दिली. यावेळी महागामीच्या कलावंतांनी पारंपरिक भारतीय नृत्य कथ्थक, ओडिसी यांचे सादरीकरण केले. शिष्टमंडळाने पारंपरिक भारतीय नृत्यकलेतील बारकावे, सादरीकरण, साधना समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पार्वती दत्ता यांनी त्यांना माहिती दिली.
भारतीय संगीतावर चिनी नृत्य
महागामीच्या कलावंतांनी सादरीकरण केल्यानंतर शिष्टमंडळातील नृत्य शिक्षकांनीही चीनमधील पारंपरिक नृत्याचे सादरीकरण केले. हार्मोनियम आणि तबल्याच्या सूर-तालावर चिनी नृत्याचे सादरीकरण असा संगम यावेळी घडून आला. यावेळी जँग पिंग यांनी चीनमधील कला दाखविली.
परंपरा जतन करण्याचा प्रयत्न
चिनी पाहुण्यांनी भारतीय नृत्य परंपरा जोपासत त्यास संरक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या महागामीच्या कार्याचे कौतुक केले. चीनमधील परंपरागत नृत्यकला अलीकडच्या काळात खंडित झाली आहे. बीजिंग डान्स अकॅडमीही अशा खंडित झालेल्या कला, नृत्य परंपरा जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे.नृत्यमुद्रा..
. शहरातील नृत्य-गुरुकुल महागामीस बीजिंग डान्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय समन्वय संचालक जँग पिंग, अकॅडमीच्या वरिष्ठ नृत्य शिक्षिका ज्यू ली आणि झँग जिंग यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी महागामीच्या संचालिका गुरू पार्वती दत्ता यांच्यासह चिनी पाहुण्यांनी नृत्यातील अशी भावमुद्रा साकारली.

Web Title: Chinese actresses love the Indian dance