मुख्यमंत्र्यांकडून होणार दुष्काळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 13:21 IST2015-08-31T13:21:04+5:302015-08-31T13:21:05+5:30

लातूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र झाली असून, चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लातूर शहरातही पाणीटंचाई आहे.

Chief Minister will conduct drought checks | मुख्यमंत्र्यांकडून होणार दुष्काळाची पाहणी

मुख्यमंत्र्यांकडून होणार दुष्काळाची पाहणी

लातूर : लातूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र झाली असून, चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लातूर शहरातही पाणीटंचाई आहे. या दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २ सप्टेंबर रोजी लातूर दौर्‍यावर आहेत. लातूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर तालुक्यांतील काही गावांना ते भेटी देणार आहेत. 
रविवारी सुटी असूनही जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी बैठका घेऊन दौर्‍याची जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकृत दौरा आला नसला तरी प्रशासनाकडून मात्र जय्यत तयारी सुरू आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.
लातूर तालुक्यातील बाभळगाव व पेठ शिवारातील पिकांची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस करणार आहेत. त्यानंतर निलंगा तालुक्यातील अंबुलगा व निटूर परिसरातील गावांत मुख्यमंत्री भेट देणार आहेत. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरूर अनंतपाळ व साकोळ या गावांना भेटी दिल्यानंतर मुख्यमंत्री रेणापूर तालुक्यातील खरोळा, पानगाव आदी गावांना भेटी देणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. २ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसभर लातूर जिल्ह्यात राहणार आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) बैठकांवर बैठका..
■ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी रविवारी विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठका घेतल्या. दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कामांबाबत त्यांनी अधिकार्‍यांना काही सूचनाही या बैठकीत केल्या.

Web Title: Chief Minister will conduct drought checks