आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
By बापू सोळुंके | Updated: September 13, 2025 11:53 IST2025-09-13T11:52:45+5:302025-09-13T11:53:45+5:30
या सरकारची केवळ लाडकी बहिण योजना सोडली तर अन्य एकही योजना काम करीत नाहीत

आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटिअर लागू झाल्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. काल एका तरुणाने आत्महत्या केली. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी चालता-बोलता पत्रकारांशी न बोलणं शोभत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ यांच्यासोबत एकत्रित पत्रकार परिषद घ्यावी. त्यांच्याकडे जागा नसेल तर शिवसेनाभवनमध्ये जागा देतो, पण पंतप्रधान मोदी सारखं पत्रकार परिषद घ्यायला घाबरू नये, टोला उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी(दि.१३) येथे पत्रकार परिषदेत केली.
खा.राऊत छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले असता शनिवारी त्यांनी जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. अनैतिक कृत्यातून हे सरकार अस्तित्वात आले आहेत. भ्रष्टाचार, आर्थिक लूटीच्या योजनांच या सरकारच्या सुरू असल्याचा आरोप खा.राऊत यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा तुम्ही सक्षम नेतृत्व असा उल्लेख केला, याकडे लक्ष वेधले असता खा.राऊत म्हणाले की, होय, देशात पंतप्रधान नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे सक्षम नेतृत्व ते म्हणतात ना, त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथील अवैध उत्खनन प्रकरणांत मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितला आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले की मुख्यमंत्री अहवाल मागविणे आणि एसआयटी नेमण्यात विक्रम करीत आहेत. कारवाई मात्र ते करत नसल्याचे राऊत म्हणाले. बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटिअरनुसार एस.टी. प्रवर्गातून आरक्षणाची मागणीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावे, असे राऊत म्हणाले. लाखो मते चोरी करून त्यांनी बहुमत मिळवले आहे. यामुळे हा प्रश्न त्यांनी सोडविला पाहिजे. या सरकारची केवळ लाडकी बहिण योजना सोडली तर अन्य एकही योजना काम करीत नसल्याचा आराेप त्यांनी केला.
...तेव्हा पंतप्रधान मोदींनी तोंड उघडले नाही
जेव्हा मणीपुर जवळ होते, कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची विटंबना सुरू होती, तरुण मारले जात होते, महिलांची नग्न धिंड काढली जात होती, तेव्हा मोदींनी तोंड उघडले नाही. आता ते तेथे जाऊन कोणाला भेटणार, काय बोलणार , त्यांचा दौरा म्हणजे निव्वळ बकवास आणि ढोंग आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
प्रखर राष्ट्रभक्त भारत-पाक सामना पाहणार नाही
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या तिकिटांना फारसा प्रतिसाद नाही, याविषयी विचारले असता राऊत म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाहीत, जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत, ज्यांनी पहलगाम हल्ला पाहिलाय, देश त्या धक्क्यातून अजूनही सावरलेला नाही, असे लाखो क्रिकेटप्रेमी असले, तरी ते हा सामना पाहणार नाहीत. भाजपचे लोक पाहतील.