छत्तीसगडच्या मजुराकडून विवाहितेचा भररस्त्यात विनयभंग, विकृताला जमावाकडून चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 14:36 IST2025-07-22T14:33:50+5:302025-07-22T14:36:22+5:30
सातारा पोलिसांचा हस्तक्षेप : छत्तीसगडच्या मजुराला तत्काळ अटक

छत्तीसगडच्या मजुराकडून विवाहितेचा भररस्त्यात विनयभंग, विकृताला जमावाकडून चोप
छत्रपती संभाजीनगर : प्लाॅटची पाहणी करण्यासाठी गेलेल्या विवाहितेच्या मागे जात तिचा भर रस्त्यावर एकाने विनयभंग केला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर स्थानिकांनी विकृताला चोप दिला. अभिषेक रामफल कैवर्त्य (१९, रा. मूळ छत्तीसगड) असे त्याचे नाव आहे.
३२ वर्षीय विवाहितेच्या मैत्रिणीला प्लॉट खरेदी करायचा असल्याने ते कुटुंबासह गोलवाडी परिसरात प्लॉटची पाहणी करण्यासाठी गेले होते. सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास ते रस्त्यावर उभे असताना दोन टवाळखोर आरडाओरड करत तेथून पायी जात होते. त्यापैकी एकाने विवाहितेचा विनयभंग केला. विवाहितेने त्याला सुनावले. ते ऐकताच स्थानिकांनी धाव घेतली. त्यानंतरही विकृत अरेरावी करत होता. त्यामुळे स्थानिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. साताऱ्याचे निरीक्षक संग्राम ताटे यांना घटना कळताच त्यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले यांनी पथकासह धाव घेत अभिषेकची जमावाच्या तावडीतून सुटका केली.
रात्री गुन्हा दाखल, अटक
पोलिसांनी अभिषेकला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर विवाहितेच्या तक्रारीवरून उपनिरीक्षक अमोल कामठे यांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली. मूळ छत्तीसगडचा असलेला अभिषेक मोलमजुरी करून मावशीकडे राहत असल्याचे कामठे यांनी सांगितले.