छत्रपती संभाजीनगराला मिळणार 'ग्रीन लूक'; १२ पॉकेट गार्डन्स, ६ ठिकाणी आकर्षक प्रवेशद्वारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:15 IST2025-11-14T15:12:40+5:302025-11-14T15:15:21+5:30
३० कोटी खर्च करून शहरात पॉकेट गार्डन; सहा रस्त्यांवर भव्य प्रवेशद्वारे उभारण्यात येणार

छत्रपती संभाजीनगराला मिळणार 'ग्रीन लूक'; १२ पॉकेट गार्डन्स, ६ ठिकाणी आकर्षक प्रवेशद्वारे
छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत महापालिकेला यापूर्वीच तब्बल ६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात ३२ कोटींचा निधी मिळाला. दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी मिळाले असून, यातून शहरातील मुख्य रस्ते, ओपन स्पेसवर १० ते १२ ठिकाणी पॉकेट गार्डन तयार केले जाणार आहेत. या शिवाय शहराच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे.
शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी मनपाने विविध उपाययोजना केल्या आहेत. चार वर्षांपूर्वी ३२ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यामुळे शहरातील दहा चौकांचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी कारंजे सुरू करण्यात आले. रस्त्याच्या कडेला व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आले. हवेतील गुणवत्ता तपासण्यासाठी दोन ठिकाणी मशीन बसविण्यात आल्या. दुभाजक तयार करून त्यामध्ये झाडे लावण्यात आली. आता ३० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचे नियोजन घनकचरा विभागाकडून केले जात आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या बाजूला आणि जिथे मोकळ्या जागा आहेत, तेथे पॉकेट गार्डन तयार करण्यात यावेत असे नियोजन आहे.
या सहा ठिकाणी उभारणार प्रवेशद्वारे
शहराचे प्रवेशद्वार असलेले जालना रोड, पैठण रोड, जळगाव रोड, पुणे रोड, मुंबई रोड, बीड बायपास या सहा रस्त्यांवर प्रवेशद्वारे उभारली जाणार असून त्यापैकी तीन ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे. प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासकांनी घनकचरा विभागाला केल्या आहेत.