छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पाणीपुरवठ्यात गुरुवारपासून (दि. २० मार्च) तब्बल ३० तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या शटडाऊन काळात रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाच्या खाली १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरूस्ती, नक्षत्रवाडी पाणीपुरवठा केंद्रासह अन्य छोटीमोठी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन दिवस शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी दिली.
उन्हाळ्यापूर्वी महापालिकेला शटडाऊन घ्यायचे होते. मात्र अधूनमधून तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला होता. मागील आठवड्यात रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली तिरुपती सोसायटीजवळ नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गंत ११०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत होती. कंपनीकडून मनपाच्या १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागला. त्यामुळे थोडे लिकेज सुरू झाले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गळती पाहून पळ काढला. मनपा अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पाहणी करून शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला.
सकाळी ११ वाजता पाणी बंदगुरुवारी सकाळी ११ वाजता शहराचा पाणीपुरवठा जायकवाडी धरणातून बंद करण्यात येईल. त्यानंतर लगेच रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली दुरुस्तीचे काम सुरू होईल. नक्षत्रवाडी येथील डोंगरावर एमबीआरमध्येही काम करायचे आहे. या शिवाय फारोळा, जायकवाडी आणि अन्य ठिकाणी लहान-मोठ्या लिकेजची, विद्युत विभागाची दुरूस्ती करण्यात येईल.
शुक्रवारपर्यंत चालतील कामेशुक्रवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू राहणार आहेत. त्यानंतर जायकवाडीहून शहरात पाणी आणण्याचे काम सुरू राहील. शुक्रवारी रात्री सर्व जलकुंभ भरून घेऊन शनिवारी सकाळी शहराला पाणी देण्याचे काम सुरू होईल, असे फालक यांनी सांगितले.
पाण्याचे टप्पे दोन दिवसानंतरगुरुवार, शुक्रवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते. त्यांना थेट शनिवारी पाणी मिळेल. शनिवारनंतरचे सर्व पाण्याचे टप्पे दोन दिवस पुढे ढकलण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन मनपाने केले आहे.