छत्रपती संभाजीनगर हादरले! CA च्या विद्यार्थ्याने सिलिंडर स्फोट घडवून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:58 IST2025-08-21T12:57:21+5:302025-08-21T12:58:26+5:30

एक प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सिलिंडरमध्ये चाकू खुपसून ते पेटवले

Chhatrapati Sambhajinagar was shaken! An attempt failed, CA student Om Rathod ended his life by causing a cylinder explosion | छत्रपती संभाजीनगर हादरले! CA च्या विद्यार्थ्याने सिलिंडर स्फोट घडवून संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर हादरले! CA च्या विद्यार्थ्याने सिलिंडर स्फोट घडवून संपवलं जीवन

 

छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयातून काकाच्या घरी जात २० वर्षीय ओम संजय राठोड या तरुणाने स्वत:हून सिलिंडरचा स्फोट घडवून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी पाच वाजता हेडगेवार रुग्णालयासमोरील न्यू शांतिनिकेतन कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली.

मूळ अण्णा तांड्यावरील ओम नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होता. सध्या त्याचे कुटुंब बंबाटनगरमध्ये वास्तव्यास असून, महाविद्यालयामुळे ओम अनेकदा न्यू शांतिनिकेतन कॉलनीतील काकांकडे ये-जा करत होता. बुधवारी सकाळी महाविद्यालयात आयकार्डचे काम करून तो थेट काकांच्या घरी पोहोचला. साधारण चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या काकू मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी घराबाहेर गेल्या. पाच वाजण्याच्या सुमारास परतल्यावर घराचा दरवाजा, खिडक्या बंद होत्या. काकूने आवाज देऊनही ओम प्रतिसाद देत नसल्याने तिने शेजाऱ्यांकडे धाव घेतली. तोपर्यंत घरात स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच हलकल्लोळ उडाला.

खिडक्या फुटल्या, घरे हादरली
काकू शेजाऱ्यांसह घराच्या दिशेने धाव घेत असतानाच स्फोट व आगीने परिसर हादरला. खिडक्यांच्या काचाही फुटल्या. समोरच्या इमारतीत काम करणाऱ्या मजुरांनी तत्काळ धाव घेत दरवाजा तोडला. मात्र, स्वयंपाकघरातून आगीचे मोठे लोळ बाहेर आले. त्यामुळे आत नेमके काय झाले, ओमला नेमके किती लागलेय, हे कळणे अशक्य होते. माहिती कळताच अग्निशमन अधिकारी विजय राठोड, अशोक खांडेकर, चेतन तरोळे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. पाण्याच्या फवाऱ्याने आग नियंत्रणात आणत सिलिंडरचा स्फोट होण्याआधी बाहेर काढून त्याच्यावर पाणी टाकण्यात आले.

गंभीर भाजलेल्या अवस्थेत ओम
जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार, सहायक निरीक्षक अतिश लोहकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ओम सिलिंडरजवळच गंभीर भाजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

घटना आत्महत्येच्या दिशेने का?
-पोलिस व अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या हॉलमध्ये पंख्याला साडी लटकवलेली आढळली. शिवाय, पंख्याचे एक पातेदेखील पूर्णपणे वाकलेला होता.
-सिलिंडरमध्ये चाकूसदृश वस्तू खुपसलेली आढळली. त्या वस्तूच्या मदतीनेच ओमने गॅस लिक करून पेटवल्याचा दाट संशय पोलिस व अग्निशमन विभागाला आहे.
-घराचा दरवाजा, खिडक्या आतून बंद आढळल्या. शिवाय, गॅस लिक झाल्याचे कळल्यानंतर व्यक्ती दरवाजाच्या दिशेने धाव घेते. ओम मात्र सिलिंडरजवळच पडलेला आढळून आला. या सर्व बाबी आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे दर्शवते.

अभ्यासात स्कॉलर, सगळेच अवाक्
ओम अभ्यासात अत्यंत हुशार होता. बारावीतदेखील त्याने ९४ टक्के गुणांसह विशेष प्रावीण्य मिळवले होते. त्यानंतर त्याने सी. ए. होण्याचे ठरवून अभ्यासदेखील सुरू केला होता. सर्वांमध्ये हसूनखेळून मिसळणाऱ्या ओमने हे टोकाचे पाऊल का उचलले, या रहस्याने सगळेच अवाक् झाले होते. दरम्यान, घटनेनंतर जवाहरनगर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला. गुरुवारी ओमच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्याचे वडील खासगी नोकरी करतात, तर त्यांच्या कुटुंबातील बहुतांश नातेवाईक शासकीय अधिकारी आहेत.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar was shaken! An attempt failed, CA student Om Rathod ended his life by causing a cylinder explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.