छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद विमान १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान ‘जमिनी’वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:00 IST2025-12-03T17:55:27+5:302025-12-03T18:00:03+5:30
आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारे विमान ऑपरेशनल कारणाने रद्द

छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद विमान १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान ‘जमिनी’वर
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोचे आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारे हैदराबादचे विमान १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान रद्द करण्यात आले आहे. ‘ऑपरेशनल रिझन’ असे कारण देत ही विमानसेवा रद्द करण्यात आली; परंतु अचानक विमानसेवा रद्द केल्याने प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाल्याची ओरड होत आहे.
इंडिगोकडून हैदराबादसाठी दररोज विमानसेवा सुरू आहे. त्याबरोबरच सोमवार, बुधवार, शुक्रवार अशी आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारी विमानसेवाही सुरू आहे. आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारे विमान हे हैदराबादहून सकाळी १०:५५ वाजता उड्डाण घेऊन दुपारी १२:२५ वाजता शहरात येते. नंतर १२:५५ वाजता उड्डाण घेऊन दुपारी २:२० वाजता हैदराबादला पोहोचते. हे विमान १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान रद्द करण्यात आले आहे. हे विमान तात्पुरते रद्द करण्यात आल्याची माहिती इंडिगोने दिली आहे.
ऐन प्रवासाच्या काळात गैरसोय
इंडिगो एअरलाइन्सने हैदराबाद - छत्रपती संभाजीनगर - हैदराबाद सेवा रद्द करण्याचा शेवटच्या क्षणी अचानक घेतलेला निर्णय खरोखरच धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. पर्यटक, व्यावसायिक, लग्नासाठी भेट देणारे मित्र आणि कुटुंबीयांसाठी प्रवास करण्यासाठी हा पीक सीझन आहे. इंडिगो एअरलाइन्सने शेवटच्या क्षणी रद्द करण्याच्या अशा योजनेमुळे सर्वांचा प्रवास प्लॅन गोंधळात पडला आहे.
- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, ‘एटीडीएफ’