तक्रार घेऊन गेली अन् घात झाला! ५७ वर्षांच्या PSI कडून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:45 IST2026-02-20T19:39:08+5:302026-02-20T19:45:31+5:30
पोलिस उपनिरीक्षकाचे मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत कृत्य, कुटुंबाकडूनही मारहाण; ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल

तक्रार घेऊन गेली अन् घात झाला! ५७ वर्षांच्या PSI कडून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार
छत्रपती संभाजीनगर : मोबाइल हरवल्याची तक्रार घेऊन आलेल्या २३ वर्षीय मुलीसोबत ५७ वर्षांचा क्रांती चौक ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुभाष चव्हाणने मैत्री केली. यानंतर विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहताच तीन वेळा गर्भपातही करण्यात आला. यात कुटुंबाने तरुणीलाच मारहाण केल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. त्यावरून चव्हाणवर गुरुवारी बलात्कार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित २३ वर्षीय तरुणी ७ मार्च, २०२५ रोजी क्रांती चौक ठाण्यात मोबाइल हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेली होती. तेव्हा ठाण्यात हजर चव्हाणने तिचा अतिरिक्त मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर तपासाचे कारण करून चव्हाण तिला सतत संपर्क करू लागला. १७ मार्चला मोबाइल सापडल्याचे सांगून चव्हाणने संबंधित तरुणीला हॉटेलमध्ये बोलावले. त्यानंतर विश्वासात घेतले. मी तुझी जबाबदारी घेतो, लग्न करतो, असे आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. रेल्वेस्थानक परिसर, अहिल्यानगरात तिला सातत्याने भेटत राहिला. जून २०२५ मध्ये तरुणी गर्भवती राहिल्याचे कळाल्यानंतर चव्हाणने तातडीने तिला पुण्यात नेत गर्भपात घडवून आणला.
जुलै २०२५ मध्ये मात्र चव्हाणने तरुणीला धमकावणे, जातिवाचक शिवीगाळ करण्याचे प्रकार सुरू केले. तिला शहरात बोलावून घाबरवून, धमकावून बलात्कार करून मारहाण करू लागला. तरुणीने याबाबत त्याच्या कुटुंबाला हा प्रकार सांगण्याची धमकी दिल्यावर त्याने तिच्यावरच उलट खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
पत्नी, मुलाकडून तरुणीला मारहाण
चव्हाणच्या घरापर्यंत त्याच्या या कृत्याबाबत माहिती पोहोचली. तरुणीच्या तक्रारीतील आरोपानुसार, ती दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर चव्हाणची पत्नी नर्मदा, मुलगा सागरने गर्भपात करण्यासाठी तिला मारहाण केली. १८ जानेवारीला तरुणी न्यायालयात गेली. तेव्हा चव्हाणने तिला तेथेही धमकावले. त्यामुळे संतप्त तरुणीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यावरून चव्हाणसह त्याची पत्नी, मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख अधिक तपास करत आहेत.