छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचना अंतिम; आराखड्यात किरकोळ बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 20:19 IST2025-10-06T20:18:50+5:302025-10-06T20:19:50+5:30
काही ठिकाणी लोकसंख्येत बदल, राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचना अंतिम; आराखड्यात किरकोळ बदल
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर आलेल्या ५५२ आक्षेपांवर गेल्या महिन्यात सुनावणी घेऊन प्रभाग रचना किरकोळ बदलांसह अंतिम केली. अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध झाली असून, त्यावर रविवारी राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
काही प्रभागांतील वसाहतींची हद्द वाढल्याने एकूण लोकसंख्येत बदल झाला आहे, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येत काही प्रभागांत वाढ, तर काही प्रभागांत कमी झाली आहे. महापालिकेने २३ ऑगस्ट रोजी प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध केल्यावर नागरिकांकडून ४ सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत ५५२ आक्षेप दाखल झाले. आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे आयोगाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. सुनावणीनंतर महापालिका प्रशासकांनी सर्व झोन अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करून पडताळणी केल्यानंतर शासनाला सुनावणीचा अहवाल सादर केला. निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभाग रचना आराखड्याला मान्यता दिल्यावर आराखडा संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. प्रारूप आणि अंतिम प्रभाग रचना आराखड्यात नेमका काय बदल झाला, याचा शोध घेण्यासाठी इच्छुकांची टीम रविवारी सरसावली होती. दरम्यान, आराखड्यात किरकोळ बदल करून सुधारणा केल्याचा दिखावा शासन व पालिकेने केल्याचा आरोप विरोधकांनी केला.
अंतिम आराखड्यातील काही बदल असे-
-प्रभाग क्रमांक २ मध्ये भारत मातानगर एन-१२, छत्रपतीनगर, एन-२, सारा वैभव, महमूदपुरा, फरहतनगर, एन-१३ भागश:चा समावेश केला आहे.
-प्रभाग क्र. ३ मध्ये गणेश कॉलनी भागश:, एन-१२ चाऊस कॉलनी, हिमायत बागेचा समावेश.
-प्रभाग क्र. ८ मध्ये मारुतीनगर, भवानीनगर, नारेगाव भागश: वाढविला.
-प्रभाग क्र. ९ मध्ये चिकलठाणा भागश:, सावित्रीनगर, पटेलनगर, वसंतनगर अंशत:, मिसारवाडी भागश: वाढविला.
-प्रभाग क्र. १० मध्ये सावरकरनगर, अष्टविनायकनगर, मायवर्ल्ड आदी भागांचा समावेश आहे.
अंतिम रचनेवर राजकीय पक्ष काय म्हणतात...
खूप मोठ्या प्रमाणावर बदल केलेले नाहीत, असे मत उद्धवसेनेचे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी व्यक्त केले. महायुतीच्या उमेदवारांना फायदा होईल, अशीच रचना आराखड्यात कायम ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी केला.
नियम व निकषानुसारच प्रभाग रचना झालेली आहे, असा दावा शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी केला, तर आम्ही रचना वगैरे काही पाहत नाही, निवडणूक हेच लक्ष्य असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे म्हणत आहेत.