टँकरच्या धडकेने मजुराच्या छातीतून आरपार घुसला रॉड, जागीच मृत्यू; छ. संभाजीनगरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:50 IST2026-03-06T12:49:33+5:302026-03-06T12:50:36+5:30

झाल्टा फाट्यावर भीषण अपघात, बेजबाबदार टँकर चालकासह निष्काळजीपणा करणाऱ्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar: Laborer Killed After Iron Rod Pierces Chest in Horrific Tanker Accident at Zalta Phata | टँकरच्या धडकेने मजुराच्या छातीतून आरपार घुसला रॉड, जागीच मृत्यू; छ. संभाजीनगरातील घटना

टँकरच्या धडकेने मजुराच्या छातीतून आरपार घुसला रॉड, जागीच मृत्यू; छ. संभाजीनगरातील घटना

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावर साइड इफेक्ट (पांढरे पट्टे) मारण्याचे काम करताना सुसाट गॅस टँकरने (एमएच २७ - डीटी ४५०६) कामगाराला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयावह होती की यात कामगार पुंडलिक निवृत्ती नवगिरे (४०, रा. पिंपळगाव पांढरी) हे पट्टे मारणाऱ्या मशीनवर जाऊन पडून त्याचा लोखंडी रॉड त्यांच्या छातीतून आरपार बाहेर पडला. यात नवगिरे जागीच मृत्युमुखी पडले. केंब्रिज चौक झाल्टा चौक रस्त्यावर गुरुवारी सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, झाल्टा परिसर व परिसरातील सर्व महामार्गांवर सध्या साइड इफेक्ट पट्टे मारण्याचे काम सुरू आहे. एका खासगी कंपनीकडून कंत्राट घेऊन ठेकेदारामार्फत हे काम सुरू आहे. पुंडलिक नवगिरे हे मशीनद्वारे रस्त्यावर पट्टे मारत होते. ११ वाजेच्या सुमारास पुंडलिक कामात व्यस्त असताना मागून सुसाट आलेल्या टँकरचालकाने थेट त्यांच्या अंगावर जात उडवले. यात पुंडलिक काही अंतरावर असलेल्या मशीनवर कोसळून मशीनचा लाेखंडी रॉड त्यांच्या छातीत घुसून पाठीतून बाहेर निघाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच चिकलठाणा पोलिसांनी धाव घेत पुंडलिक यांचा मृतदेह मिनी घाटीच्या शवविच्छेदनगृहात नेला.

कामगारांच्या सुरक्षेचे काय?
अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमून तणाव निर्माण झाला होता. पुंडलिक काम करीत असताना संबंधित कंपनी व ठेकेदाराने सुरक्षेच्या कुठल्याच उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यांच्या मदतीला जबाबदार अधिकारी, सहकारीदेखील नियुक्त केला नाही. त्यांच्या बेजबाबदारपणा व हलगर्जीपणामुळेच पुंडलिक यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. नवगिरे हे कुटुंबात कमावणारे एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल
मृत पुंडलिक यांचे भाऊ विठ्ठल नवगिरे यांच्या तक्रारीवरून पुंडलिक यांच्या मृत्यूस जबाबदार टँकर चालक, जी.एन.आय. कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टर व सुपरवायझरवर चिकलठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक समाधान पवार अधिक तपास करीत आहेत.

Web Title : टैंकर ने मजदूर को कुचला: छाती में घुसा रॉड, मौके पर मौत; छत्रपति संभाजीनगर की घटना

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में तेज रफ्तार टैंकर ने सड़क पर काम कर रहे एक मजदूर को कुचल दिया। टक्कर से मजदूर की छाती में रॉड घुस गई, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। सुरक्षा में लापरवाही का आरोप, पुलिस जांच जारी।

Web Title : Tanker Kills Worker: Rod Pierces Chest, Instant Death in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : A speeding tanker fatally struck a road worker in Chhatrapati Sambhajinagar. The impact forced a metal rod through his chest, killing him instantly. Negligence in safety measures is alleged, leading to a police investigation and filing of charges.