लाभक्षेत्र विकास प्राधिकरण ‘कडा’ अॅक्शन मोडवर; विक्रमी २०० कोटी पाणीपट्टी वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:45 IST2026-03-25T15:45:16+5:302026-03-25T15:45:18+5:30

एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच वसुली; जायकवाडी प्रकल्प कार्यालयाने छत्रपती संभाजीनगर मनपाला पाणीपट्टीच्या थकबाकीसह ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपयांचे बील दिले आहे.

Chhatrapati Sambhajinagar KADA Records Historic ₹200 Crore Water Cess Collection; Parli Thermal Power Pays ₹100 Crore | लाभक्षेत्र विकास प्राधिकरण ‘कडा’ अॅक्शन मोडवर; विक्रमी २०० कोटी पाणीपट्टी वसुली

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण ‘कडा’ अॅक्शन मोडवर; विक्रमी २०० कोटी पाणीपट्टी वसुली

छत्रपती संभाजीनगर : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात कडा, छत्रपती संभाजीनगर सर्कल कार्यालयांतर्गत जायकवाडी प्रकल्पासह विविध धरणांतून बिगर सिंचन वापरासाठी देण्यात येणाऱ्या पाण्याच्या शुल्कापोटी यंदा आतापर्यंत २०० कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती आहे. यात सर्वाधिक ९९ कोटी ९८ लाख रुपये पाणीपट्टीचा वाटा परळी थर्मल पॉवरने जमा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत, छत्रपती संभाजीनगर कडा कार्यालयाचा समावेश होतो. या कार्यालयाच्यावतीने धरणांतील पाणी व्यवस्थापन आणि दुरुस्तींची कामे करण्यात येतात. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी, तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांना पाण्याचा पुरवठा याच कार्यालयाच्या परवानगीने करण्यात येतो. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचा सर्वाधिक वापर सिंचनासाठी आणि बिगर सिंचनाकरिता देखील केला जातो. एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण अशा शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाटबंधारे विभागाकडून पाणी पट्टीची देयके देण्यात येतात.

३१ मार्चपर्यंत आणखी वसुलीची शक्यता
कडा कार्यालयाला यंदा ८८ कोटी रुपयांच्या पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट वरिष्ठ कार्यालयाने दिले होते. ही वसुली करण्यासाठी कडा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी संबंधित पाणी वापरकर्त्यांना, संस्थांना नोटीसा बजावल्या होत्या. शिवाय अधिकाऱ्यांना वसुलीसाठी संबंधितांच्या भेटी घेण्याचे निर्देश दिले होते. याचे सकारात्मक पडसाद दिसू लागले आहे. कडा कार्यालयास मिळालेल्या उद्दिष्टापेक्षा अडीचपट अर्थात दोनशे कोटी रुपयांची वसुली यंदा आतापर्यंत झाली आहे. ३१ मार्चपर्यंत आणखी ही रक्कम वाढणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

परळी थर्मल पाॅवरकडे ५०० कोटींची थकबाकी....
बीड जिल्ह्यातील परळी येथील थर्मल पॉवर स्टेशनकडे पाणीपट्टीची तब्बल ५०० कोटी रुपयांची थकबाकी होती. ही थकबाकी तात्काळ द्यावी अन्यथा पॉवर स्टेशनचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला होता. यानंतर दोन दिवसांपूर्वी परळी थर्मल पाॅवरने तब्बल ९९ कोटी ९८ हजार रुपये कडा कार्यालयाकडे जमा केल्याची माहिती आहे.

महापालिकेसोबत लवकरच बैठक
जायकवाडी प्रकल्प कार्यालयाने छत्रपती संभाजीनगर मनपाला पाणीपट्टीच्या थकबाकीसह ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपयांचे बील दिले आहे. यासोबतच मनपाने नवीन जॅकवेलची स्थापना जायकवाडी प्रकल्पात केली आहे. याबद्दल २०१ कोटी १३ लाख १८ हजार रुपयांची स्वतंत्र मागणी करण्यात आली. ही रक्कम अदा करण्यासाठी जायकवाडी प्रकल्प कार्यालयाने पाणी बंद करण्याची नोटीस दिली होती. या नोटीसला उत्तर देताना महापालिकेने एक बैठक आयोजित करुन निर्णय घेऊ असे कळविले.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar KADA Records Historic ₹200 Crore Water Cess Collection; Parli Thermal Power Pays ₹100 Crore