आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणार छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद विमान मार्चपर्यंत रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:49 IST2025-12-26T13:37:53+5:302025-12-26T13:49:42+5:30
छत्रपती संभाजीनगराच्या कनेक्टिव्हिटीत घट, हैदराबाद विमान नव्या वर्षातही ‘जमिनी’वरच

आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणार छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद विमान मार्चपर्यंत रद्द
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोचे आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारे हैदराबादचे विमान १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान रद्द केले होते. आता इंडिगोने संपूर्ण हिवाळी सत्रात ही विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या विमानाची जानेवारीपासूनचीही बुकिंग बंद आहे. यामुळे हैदराबादसाठी केवळ सकाळच्या वेळेत विमान उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
इंडिगोकडून हैदराबादसाठी दररोज विमानसेवा सुरू आहे. त्याबरोबरच सोमवार, बुधवार, शुक्रवार अशी आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारी विमानसेवाही सुरू होती. आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारे विमान हे हैदराबादहून सकाळी १०:५५ वाजता उड्डाण घेऊन दुपारी १२:२५ वाजता शहरात येत होते. नंतर १२:५५ वाजता उड्डाण घेऊन दुपारी २:२० वाजता हैदराबादला पोहोचत होते. आधी हे विमान १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान रद्द करण्यात आले. आता ही विमानसेवा मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
इंडिगोचे गोवा विमान रद्द
इंडिगोचे गोवा - छत्रपती संभाजीनगर - गोवा विमान गुरुवारी रद्द करण्यात आले. हे विमान दुपारी ४ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर येते आणि त्यानंतर ४:४५ वाजता गोव्यासाठी उड्डाण घेते. बंगळुरूहून गोव्याला येणारे विमान बंगळुरू येथील धुक्याच्या वातावरणामुळे रद्द झाले. त्यामुळे गोवा - छत्रपती संभाजीनगर - गोवा विमान गुरुवारी रद्द झाले. त्याविषयी प्रवाशांना सकाळीच माहिती देण्यात आल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.
ऐन प्रवासाच्या काळात गैरसोय
पर्यटक, व्यावसायिक, लग्नासाठी भेट देणारे मित्र आणि कुटुंबीयांसाठी प्रवास करण्यासाठी हा पीक सीझन आहे. अशा परिस्थितीत इंडिगो एअरलाइन्सने हैदराबाद - छत्रपती संभाजीनगर - हैदराबाद सेवा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे.