छत्रपती संभाजीनगरच्या फळविक्रेत्याचा अहिल्यानगरमध्ये खून; १२ दिवसांनंतर गुन्ह्याची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:07 IST2025-07-04T19:06:48+5:302025-07-04T19:07:36+5:30

व्यावसायिक वादातून खून करून मृतदेह जाळला; पोलिसांना १२ दिवसांनंतर गुन्ह्याची उकल करण्यात यश

Chhatrapati Sambhajinagar fruit vendor murdered in Ahilyanagar; Crime solved after 12 days | छत्रपती संभाजीनगरच्या फळविक्रेत्याचा अहिल्यानगरमध्ये खून; १२ दिवसांनंतर गुन्ह्याची उकल

छत्रपती संभाजीनगरच्या फळविक्रेत्याचा अहिल्यानगरमध्ये खून; १२ दिवसांनंतर गुन्ह्याची उकल

छत्रपती संभाजीनगर/ पारनेर (जि. अहिल्यानगर) : व्यावसायिक वादातून फळविक्रेत्याचा खून करून मृतदेह रस्त्याच्या कडेला जाळून टाकल्याची घटना सुपा परिसरात उघडकीस आली. सुपा पोलिसांनी १२ दिवसांत गुन्ह्याची उकल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत व आरोपी दोघेही छत्रपती संभाजीनगरचे असून व्यावसायिक वादातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे.

युनूस सत्तार शेख (वय ३६, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर, हल्ली रा. हडपसर, पुणे) असे मयताचे नाव आहे. व्यवसायानिमित्त तो पुण्यात राहत होता. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरचा व्यावसायिक प्रदीप प्रभाकर शरणागत (वय २४) याला सुपा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ जून रोजी नारायणगव्हाण कुकडी कॅनॉलच्या कडेला एका पुरुषाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.

१२ दिवसांनंतर गुन्ह्याची उकल; मृतदेह जाळला होता
याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात १९ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सुपा पोलिसांनी अनेक पुराव्यांच्या आधारे मयताचा मित्र प्रदीप शरणागत याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. युनूस शेख व आरोपी प्रदीप खूप दिवसांपासून पुण्यातील भेकराईनगरमध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. परंतु त्यांच्यात व्यवसायातून वाद झाले. त्यातून आरोपी प्रदीप याने युनूस शेखचा डोक्यात दगड घालून खून केला. नंतर त्याचा मृतदेह कारमध्ये टाकून छत्रपती संभाजीनगरला घेऊन जात असताना पुणे-नगर महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात टाकला. ओळख पटू नये या उद्देशाने डिझेल टाकून मृतदेह जाळला व तो तेथून पळून गेला. सुपा पोलिसांना हा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक मोनिका जेजोट व त्यांच्या पथकाने गुन्ह्याची उकल केली.

चार पथकांची नियुक्ती
सुपा पोलिसांनी ४ पथके तयार करून नगर जिल्ह्यालगत सोलापूर, सातारा, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीडमधील पोलिस स्टेशनला हरवले असल्याबाबत कळवले होते. दरम्यान, पुणे शहरातील फुरसुंगी पोलिस स्टेशनला युनूस शेख हा मिसिंग असल्याची तक्रार दाखल होती. त्यातील मयताचे वर्णन मिळतेजुळते आल्याने या गुन्ह्याची उकल करण्यात सुपा पोलिसांना यश मिळाले आहे.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar fruit vendor murdered in Ahilyanagar; Crime solved after 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.