सख्ख्या बहिणींनी भावाला लावला २ कोटींचा चुना; मृत्युपत्रात फेरफार करून हडपले बँक बॅलन्स, प्लॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:04 IST2026-02-24T15:04:11+5:302026-02-24T15:04:43+5:30

संपत्तीसाठी नात्याला काळिमा! उद्योजक भावाची दोन बहिणींकडून फसवणूक

Chhatrapati Sambhajinagar Crime: Two Sisters Cheat Brother of ₹2 Crore; Falsify Will and Bank Nominee Details | सख्ख्या बहिणींनी भावाला लावला २ कोटींचा चुना; मृत्युपत्रात फेरफार करून हडपले बँक बॅलन्स, प्लॉट

सख्ख्या बहिणींनी भावाला लावला २ कोटींचा चुना; मृत्युपत्रात फेरफार करून हडपले बँक बॅलन्स, प्लॉट

छत्रपती संभाजीनगर : दोन सख्ख्या बहिणींनी आईला विश्वासात घेऊन भावाच्या हिश्श्याचेही बॅंक खात्यातील पैसे, प्लॉटसह शेअर्स विकून एक कोटी ९५ लाख रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उद्योजक भावाच्या तक्रारीवरून पश्चिम बंगाल व राज्यस्थानमधील बहिणी विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संशयित आरोपींमध्ये सुनीता दिलीप लाहोटी (रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) आणि शोभना शरद टुवानी (रा. जयपूर, राज्यस्थान) यांचा समावेश आहे. शहरातील उद्योजक सुनीलकुमार हरिकिशन कलाणी (६४, रा. बीड बायपास) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा लिंबेजळगाव येथे कारखाना आहे. त्यांचे वडील हरिकिशन कलाणी हे मूळचे पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील व्यापारी होते. फिर्यादीच्या वडिलांचे २०२० साली कर्करोगाने निधन झाले. त्यांनी तयार केलेल्या मृत्युपत्रानुसार सिलीगुडी येथील मालमत्ता आणि बँक ठेवींचे उत्तराधिकारी म्हणून सुनील कुमार यांचे नाव होते. याचा राग मनात धरून त्यांच्या दोन बहिणी सुनीता लाहोटी (कोलकाता) आणि शोभना टुवानी (जयपूर) यांनी कट रचून आजारी आईला विश्वासात घेऊन जयपूरला नेले. त्या ठिकाणी बँक खात्यांवरील आणि डी-मॅट खात्यावरील ‘नॉमिनी’ म्हणून असलेले सुनील कुमार यांचे नाव बदलून स्वतःचे नाव लावून घेतले.

आईच्या मृत्यूनंतर प्रकरण उघडकीस
२० मार्च २०२४ रोजी आईच्या मृत्यूनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. आईच्या एचडीएफसी डी-मॅट खात्यावरील ८० लाख रुपयांचे शेअर्स बहिणींनी परस्पर स्वतःच्या खात्यावर वर्ग केले. तसेच ॲक्सिस बँक आणि पंजाब नॅशनल बँकेतील प्रत्येकी १५ लाख आणि कोटक महिंद्रा बँकेतील ५० लाख रुपये अशा मोठ्या रकमा ‘नॉमिनी’ बदलून काढून घेतल्या. त्याशिवाय जयपूर शहरातील सुशांत सिटी येथील प्लॉटवर आईच्या कोऱ्या अर्जावर सह्या घेऊन तो ३५ लाखांना विकला आणि त्याचे पैसेही दोघींनी हडपल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. अधिक तपास सातारा पोलिस करीत आहेत.

Web Title : सगी बहनों ने भाई को लगाया 2 करोड़ का चूना; वसीयत बदली, संपत्ति हड़पी।

Web Summary : दो बहनों ने कथित तौर पर अपनी मां को धोखा देकर, वसीयत बदलकर और जयपुर में बैंक बैलेंस, शेयर और एक प्लॉट जब्त करके अपने भाई को ₹1.95 करोड़ का चूना लगाया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Sisters swindle brother of ₹2 crore; alter will, seize assets.

Web Summary : Two sisters allegedly defrauded their brother of ₹1.95 crore by manipulating their mother, altering a will, and seizing bank balances, shares, and a plot in Jaipur. Police are investigating.