छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वेमार्ग कागदावरच; ‘डीपीआर’नुसार की, पुणे महामार्गालगत मार्ग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:10 IST2025-12-01T16:07:08+5:302025-12-01T16:10:01+5:30
प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या ८५ किमी अंतराच्या रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वेमार्ग कागदावरच; ‘डीपीआर’नुसार की, पुणे महामार्गालगत मार्ग?
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या ८५ किमी अंतराच्या रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ ६ महिन्यांपूर्वी केंद्राला सादर करण्यात आला. परंतु, अद्यापही हा रेल्वे मार्ग कागदावरच आहे. हा रेल्वे मार्ग ‘डीपीआर’नुसार की, पुणे महामार्गालगत होणार, याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या ८५ किमी अंतराच्या रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. विद्युतीकरणासह हा रेल्वेमार्ग ‘सिंगल’ नव्हे, तर ‘डबल लाइन’चा करण्यात येणार आहे. यासाठी २ हजार २३५ कोटी रुपये गुंतवणूक निश्चित केली होती. या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
‘डीपीआर’नुसार मार्गातील स्टेशन कोणते?
‘डीपीआर’नुसार छत्रपती संभाजीनगर- अहिल्यानगर रेल्वेमार्गात देवगिरी कॅन्ट- रांजणगाव- येसगाव- गंगापूर- देवगड- नेवासा- उस्थाळ दुमाला- शनिशिंगणापूर- ब्राह्मणी- वांभोरी या स्टेशनचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
पुणे महामार्गालगत रेल्वेमार्गाची चर्चा
छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गालगतच रेल्वेमार्ग करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्टमध्ये नागपूर येथील एका कार्यक्रमात जाहीर केले. छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गालगतच रेल्वेमार्गाची चर्चा पुढे आली आहे. त्यामुळे आता नेमका पुण्याला जाण्यासाठी कसा रेल्वे मार्ग होणार, याकडे लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्पात मंजुरी मिळावी
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली ९० हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक आणि भविष्यातील होणारी मोठी माल वाहतूक पाहता, छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर रेल्वे मार्गाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी अर्थसंकल्पात या मार्गाला मंजुरी मिळून निधीची तरतूद करावी.
- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक
लवकरच मंजुरी
छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार झालेला आहे. रेल्वे बोर्डाकडून त्यास लवकरच मंजुरी मिळेल.
- खा. डाॅ. भागवत कराड