वळणावर भरधाव ट्रकने चिरडले; बाजाराला जाणाऱ्या बाप-लेकाचा भीषण अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:17 IST2026-04-01T20:14:01+5:302026-04-01T20:17:22+5:30
वळणावर ट्रकच्या धडकेत बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; बाजाराला जाताना भीषण अपघात

वळणावर भरधाव ट्रकने चिरडले; बाजाराला जाणाऱ्या बाप-लेकाचा भीषण अपघातात मृत्यू
खुलताबाद: खुलताबाद येथील आठवडी बाजारासाठी मोटारसायकलवरून येणाऱ्या एका कुटुंबावर काळाने भीषण झडप घातली आहे. खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नंद्राबाद गावाजवळील वळणावर ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत पित्याचा जागीच मृत्यू झाला, तर दीड वर्षाच्या चिमुकल्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गेला. या अपघातात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हा थरार घडला.
किशोर छबुलाल सोनवणे (वय ३७, रा. रायपूर-डोणगाव, ता. गंगापूर, सध्या मु. कागजीपुरा) असे मृत वडिलांचे नाव असून, शिवा किशोर सोनवणे (वय १.५ वर्षे) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
वळणावर आयशरने उडवले; दृश्य होते भयावह
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर सोनवणे हे कागजीपुरा येथील एका वीटभट्टीवर कामगार म्हणून रुजू झाले होते. बुधवारी खुलताबादचा आठवडी बाजार असल्याने ते पत्नी पूजा (वय २७) आणि मुलगा शिवा यांच्यासह विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरून येत होते. नंद्राबाद जवळील वळणावर समोरून येणाऱ्या आयशर ट्रकने (MH 21 BH 4338) त्यांच्या गाडीला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, किशोर सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगा बाजूला फेकले गेले.
दीड वर्षाच्या शिवाचा रुग्णालयात अंत
अपघाताचे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, चिमुकल्या शिवाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले. जखमी पूजा सोनवणे यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. किशोर सोनवणे हे आठच दिवसांपूर्वी वीटभट्टीवर कामाला आले होते, त्यापूर्वी ते ऊसतोड कामगार म्हणून कार्यरत होते.
परिसरात हळहळ; ट्रक चालकावर गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच बीट जमादार किशोर गवळी, जाकीर शेख, सिद्धार्थ सदावर्ते आणि होमगार्ड महेश तुपे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आयशर ट्रक जप्त केला असून, चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.