छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा 'पाडापाडी' सुरू; महापालिकेचा पैठण गेटवर कारवाईचा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:50 IST2025-11-19T12:48:42+5:302025-11-19T12:50:56+5:30
छत्रपती संभाजीनगरातील पैठण गेट परिसरातील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा 'पाडापाडी' सुरू; महापालिकेचा पैठण गेटवर कारवाईचा धडाका
छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा रस्ता रुंदीकरण मोहीमेला सुरुवात झाली असून, आज सकाळीच पैठण गेट परिसरात महापालिकेचे पथक दाखल झाले. यावेळी काही मालमत्ता धारकांनी कारवाईस विरोध केला. मात्र, पथकाने विरोधास न जुमानता पाडापाडी सुरू केली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंगळवारी पैठणगेट भागात नागरिकांना सतर्क करण्यासाठी भोंगा फिरवण्यात आला. व्यापारी, नागरिकांनी स्वत:हून आपले बाधित बांधकाम, दुकाने काढून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले. सायंकाळी हर्सूल गावातही भोंगा फिरवण्यात आल्याने गावकरी आणि बाधित मालमत्ताधारक हवालदिल झाले.
जून, जुलै महिन्यांत महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवर व्यापक प्रमाणात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत शहर विकास आराखड्यानुसार बाधित अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली होती. या अनधिकृत बांधकामांची संख्या जवळपास साडेपाच हजार होती. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रस्ता रुंदीकरण मोहीम थांबविण्यात आली असावी, असे वाटत असतानाच महापालिकेच्या प्रशासनाने शहरातील १० प्रमुख रस्त्यांची यादी सोमवारी जाहीर केली. पैठणगेट भागात मागील आठवड्यात तरुणाचा निर्घृण खून झाला. या घटनेनंतर परिसरातील अनधिकृत दुकानांचा मुद्दा समोर आला. नगररचना विभागाने तातडीने ‘टोटल स्टेशन सर्व्हे’ केला. मार्किंगही केले. मंगळवारी अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी पाहणी केली. नागरिक, व्यापाऱ्यांनी स्वत:हून आपले बाधित बांधकाम काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून या भागात कारवाईला सुरुवात होईल.
पैठणगेट भागातील रस्त्यांची रुंदी
पैठण गेट ते सिल्लेखानामार्गे क्रांती चौक ३० मीटर, पैठण गेट ते सब्जी मंडी ९ मीटर, पैठण गेट ते खोकडपुरा १२ मीटरचा रस्ता आहे. तिन्ही रस्त्यांवर अनधिकृतपणे दुकाने उभारण्यात आली आहेत. मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. मालमत्ताधारकांनी मालकी हक्काची कादगपत्रे, बांधकाम परवानगी वॉर्ड कार्यालयात सादर करावी, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले.
गुरूवारी पडेगाव, शुक्रवारी हर्सूल
२० नोव्हेंबर रोजी पडेगाव मुख्य रस्ता ते एमजीएम गोल्फ कोर्स या रस्त्यावरील बाधित बांधकामे काढण्यात येणार आहेत. २१ नोव्हेंबर रोजी हर्सूल येथे कारवाई करण्यात येणार आहे. मंगळवारी सायंकाळी हर्सूल येथे भोंगा फिरवण्यात आला. त्यामुळे मालमत्ताधारकांमध्ये एकच खळबळ उडाली.
अनधिकृत बांधकाम पाडणार
रस्ता रुंदीकरणातील बाधित अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार आहे. जेव्हा महापालिकेला रुंदीकरणासाठी भूसंपादन करायचे, तेव्हा भूसंपादनही केले जाईल, असे संतोष वाहुळे यांनी सांगितले.