छ. संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहातील मुली पलायन प्रकरणी चौकशी समिती गठित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:15 IST2025-07-03T15:13:08+5:302025-07-03T15:15:23+5:30

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची विधान परिषदेत घोषणा

Chh. Sambhajinagar's Vidyadeep Children's Home escape case: Inquiry committee formed | छ. संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहातील मुली पलायन प्रकरणी चौकशी समिती गठित

छ. संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहातील मुली पलायन प्रकरणी चौकशी समिती गठित

छत्रपती संभाजीनगर/मुंबई :छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्यादीप बालगृहातील नऊ मुलींनी गच्चीवरून उड्या मारून पलायन केल्याच्या घटनेवरून संबंधित संस्थेस व बाल कल्याण समितीस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर, या घटनेची सविस्तर चौकशी करण्यासाठी बालविकास उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल सात दिवसात येणार असून त्यानंतर संबंधित संस्था व बाल कल्याण समितीबाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.

भाजप आ. श्रीकांत भारतीय यांनी मंगळवारी विधानपरिषदेत याबाबत औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर मंत्री तटकरे यांनी बुधवारी निवेदन केले. ३० जूनला छावणी येथील विद्यादीप बालगृहामधून ९ अल्पवयीन मुलींनी कॉमन बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे अस्वस्थ होऊन पलायन केले होते. २९ जूनला कॅमेरा लावल्याबाबत आक्षेप घेत त्यांनी गोंधळ घालून तो फोडला. निवास कक्षाचा दरवाजा बंद करून त्यांनी बाल कल्याण समितीसोबत बोलण्याची मागणी केली होती. समितीचे सदस्य भेटण्यास येतील, असे आश्वासन देऊन त्यांची समजूत घातली होती, अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिली.

३० जून रोजी सकाळी ११:३० वाजेपर्यंत समितीने त्यांची भेट न घेतल्याने त्यांनी पलायन केले. ९ पैकी ७ मुलींना जिल्हा न्यायालयाच्या आवारात दामिनी पथकाने ताब्यात घेतले. पाच मुलींना बाल कल्याण समितीच्या आदेशाने पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून अन्य तीन मुलींना इतर बालगृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. तर, एका मुलीचा शोध पोलिस घेत आहेत, अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिली.

सदर संस्थेविरोधात तक्रारीची ही दुसरी वेळ असून २०२३ मध्ये बालगृहाविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास छत्रपती संभाजीनगर, बाल कल्याण समिती यांनी संयुक्तपणे १ जुलैला संस्थेला भेट दिली. त्यावेळी त्यांना विविध प्रकरणांमध्ये पळून गेलेल्या, बाल विवाहातील सुटका केलेल्या, पोक्सो प्रकरणातील मुलींच्या निवास कक्षामध्ये प्रति निवास कक्ष १ सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याचे आढळले. संस्थेने सिस्टर अर्चना यांच्याकडील अधिक्षक पदाचा पदभार काढून घेतला असून तो नियमित अधिक्षिका सिस्टर डिव्हिना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

Web Title: Chh. Sambhajinagar's Vidyadeep Children's Home escape case: Inquiry committee formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.