पारंपरिक विचार बदला; परिवर्तन घडेल

By Admin | Updated: August 17, 2014 01:43 IST2014-08-17T01:21:59+5:302014-08-17T01:43:18+5:30

औरंगाबाद : व्यवसायातही परिवर्तन घडून येईल. असं काही तरी भन्नाट करून दाखवा, असा यशोमंत्र बिझनेस गुरू राकेश जैन यांनी दिला.

Change the traditional idea; The change will happen | पारंपरिक विचार बदला; परिवर्तन घडेल

पारंपरिक विचार बदला; परिवर्तन घडेल

औरंगाबाद : तुम्ही पिढ्यान्पिढ्या पारंपरिक व्यवसाय करीत आहात, आमच्यावरील विश्वासामुळे आमच्या दुकानातील कोणतीही वस्तू ग्राहक डोळे झाकून खरेदी करतात. आता या भ्रमात राहू नका. तुमची थेट स्पर्धा बहुराष्ट्रीय कंपन्यांशी आहे. काळानुसार जो स्वत:ला बदलेल तोच व्यावसायिक स्पर्धेत टिकेल. याकरिता चौकटीबाहेर जाऊन विचार करा, तो कृतीत आणा. बघा पारंपरिक व्यवसायातही परिवर्तन घडून येईल. असं काही तरी भन्नाट करून दाखवा जे जगात कुणाला सुचलं नसेल. कारण, तुम्हाला सुचलेली एक कल्पना तुमच्या व्यवसायाला उंचावर नेऊन ठेवू शकते, असा यशोमंत्र बिझनेस गुरू राकेश जैन यांनी दिला.
भारतीय जैन संघटना, जैन सोशल ग्रुप, जितो मराठवाडा चॅप्टर, महावीर इंटरनॅशनल मेट्रोसिटी, जैन इंजिनिअर्स सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बदल रहा है व्यापार, क्या आप है तयार’ या विषयावरील चर्चासत्राचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.
आपल्या पारंपरिक व्यवसाय, उद्योगात, आपल्या विचारात परिवर्तन घडवून आणण्याची प्रत्येकाच्या मनात इच्छा होती. त्याच इच्छेपोटी शेकडो व्यापारी, उद्योजक सकाळी संत एकनाथ रंगमंदिरात हजर झाले होते. प्रारंभी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बिझनेस गुरू राकेश जैन, महावीर पाटणी, सुभाष नहार, राजेश पाटणी, अतुल कोठारी, स्वप्नील पारखे, रवी लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. राजेंद्र दर्डा यांनी लोकमतची यशोगाथा सांगितली. तसेच डीएमआयसीमुळे राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या शहरात येतील, यामुळे व्यापारी, उद्योजकांना मोठ्या संधी उपलब्ध होणार असून २०२० मध्ये डीएमआयसीमुळे अडीच लाख लोकांना रोजगार मिळेल, असे त्यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
राकेश जैन यांनी सांगितले की, खानदानी व्यवसाय करणाऱ्यांच्या परिवारात मुलगा जन्मला तर त्यास व्यवसायाचे कौशल्य शिकण्यासाठी बिझनेस स्कूलमध्ये जावे लागत नाही. कारण घरातच लहानपणापासून त्याच्यावर व्यवसायाचे संस्कार होत असतात. पारंपरिक पद्धतीने तुम्ही पिढ्यान्पिढ्या व्यवसाय करीत आहात. मात्र, आता जागतिकीकरणामुळे व्यवसाय, उद्योग जगतात आमूलाग्र बदल घडून आला आहे. थेट आंतरराष्ट्रीय घडामोडींवर तुमच्या व्यवसायातील तेजी-मंदी ठरत आहे. या जागतिकीकरणात जो आपल्या व्यवसायात बदल घडून आणेल, तंत्रज्ञानात, ग्राहकाभिमुख सेवा देण्यात जो अपडेट राहील, तोच या स्पर्धेत टिकून राहील. जे सकारात्मक विचार करतात त्यांच्यासाठी जागतिकीकरणही व्यवसाय वाढीसाठी मोठी संधी ठरत आहे.
सूत्रसंचालन अमित काला यांनी केले, तर मीडिया पार्टनर लोकमततर्फे सी. ए. शैलेश चांदीवाल यांनी आभार मानले.
प्रारंभी शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सुभाष नहार यांचा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेतन ठोले, विकास पाटणी, रवी लड्डा, प्रशांत बिनायके, पीयूष गंगवाल, अतुल कोठारी, संदीप कोठारी, प्रवीण रुणवाल, हर्षवर्धन जैन, रोहित छाजेड, हितेश कांकरिया, मनोज कासलीवाल, पंकज झांझरी, नीलेश पहाडे, राजेश कांकरिया, पंकज अग्रवाल, नितेश कांकरिया, नीलेश पाटणी, कमल पहाडे, रूपाली फुरसुले आदींनी परिश्रम घेतले.
स्वप्ने पाहा, जोखीम घ्या, यशस्वी व्हा
बिझनेस गुरू म्हणाले की, व्यवसाय वाढीसाठी मोठी स्वप्ने बघा, स्वप्ने पाहणे सोडू नका. स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी जोखीम (रिस्क) घेणे गरजेचे आहे. ती घेतल्यामुळेच व्यवसायाच्या प्रगतीची उंची गाठता येईल आणि निश्चितच स्वप्नपूर्ती होईल.
नये जमाने की नई सोच
बिझनेस गुरू म्हणाले की, नवीन जमान्यानुसार आपल्या विचारातही नावीन्यता असली पाहिजे. यासाठी त्यांनी बंगळुरु येथील सुहास गोपीनाथ या मुलाची तसेच मायक्रो सॉफ्टचे बिल गेटस् आदींची यशोगाथा सांगितली.
रस असेल तरच व्यवसाय करा
सचिन तेंडुलकरला अभ्यासात नव्हे क्रिकेट खेळण्यात रस होता. त्याने रात्रंदिवस मेहनत घेऊन अनेक विश्वविक्रम केले. तसेच आपल्या जीवनात आपण गाठावयाचे ध्येय स्पष्ट ठेवा, ते गाठण्यासाठी प्रयत्न करा, त्याचा आनंद उपभोगा आणि तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीच्या विषयात रस घेता, त्याच वेळी तुम्ही तुमची प्रगती विनासायास करू शकता. यासाठी बिझनेस गुरूने व्यवसायात यशस्वी झालेल्यांची अनेक उदाहरणे दिली.

Web Title: Change the traditional idea; The change will happen