व्यावसायिकाला कर सल्लागारेनच फसवले; बनावट बिलांद्वारे ७३ लाखांंचा जीएसटी घोटाळा उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:26 IST2025-08-09T16:25:02+5:302025-08-09T16:26:31+5:30
ज्याच्या हाती दिली तिजोरीची चावी त्यानेच केली चोरी; जीएसटी खात्याचा वापर करून फसवणूक केल्याचे उघड होताच व्यावसायिकालाच दिल्या धमक्या

व्यावसायिकाला कर सल्लागारेनच फसवले; बनावट बिलांद्वारे ७३ लाखांंचा जीएसटी घोटाळा उघड
छत्रपती संभाजीनगर : गेवराईस्थित व्यावसायिकाच्या जीएसटी खात्याचा वापर करून शहरातील कर सल्लागाराने जीएसटी पोर्टलवर बनावट बिले अपलोड करत ७३ लाख ६३ हजारांचा घोटाळा केला. गाेविंद सत्यनारायण लाहोटी (रा. विनायक पार्क, देवळाई) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मधुसूदन सोनी (रा. गेवराई) यांचा व्यवसाय आहे. ऑगस्ट, २०१७ मध्ये त्यांनी लाहोटीमार्फत जीएसटीचे प्रमाणपत्र काढले होते. तेव्हापासून लाहोटीच त्यांचे करासंदर्भात कामकाज पाहत होता. जीएसटी खात्याच्या नोंदणीवेळी लाहोटीने स्वत:चाच मेल, मोबाईल क्रमांक नोंदवला. त्यामुळे सोनी यांना कुठलाच ओटीपी येत नव्हता. लाहोटी परस्पर त्यांचे व्यवहार सांभाळत होता. २७ नोव्हेंबर रोजी सोनी यांना जीएसटी कार्यालयामधून पहिली नोटीस आली. तेव्हा त्यांना हा घोटाळा समजला. त्यानंतर त्यांनी जीएसटी खात्याकडे स्वत:च्या मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंद केली.
घोटाळा करून व्यावसायिकालाच धमक्या
घोटाळ्याविषयी सोनी यांनी लाहोटीला विचारणा केली, तेव्हा त्याने गैरव्यवहार झाल्याचे मान्य करत प्रकरण मिटवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु पोलिसांत तक्रार न करण्यास धमकावले. ६ व ३१ जानेवारी रोजी पुन्हा सोनी यांना नोटिसा आल्या. तेव्हा लाहोटीने त्यांच्या जीएसटी खात्यावरून अन्य व्यक्ती व व्यवसायांच्या नावे बोगस बिले केल्याचे निष्पन्न झाले.
व्यवसायाच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार
लाहोटीने ध्रुव ट्रेडिंग, एम. एस. ट्रेडिंग, ग्लोबल ट्रेडिंग अँड कंपनीच्या नावे २०२३-२४ मध्ये खोटी खरेदी दाखवत ८३ लाख ८ हजार व त्यावरील वस्तू व सेवाकर १६ लाख ४३ हजार तसेच २०२४-२५ मध्ये १ कोटी ३५ लाख ४२ हजारांची बनावट खरेदी दाखवून त्यावर ३४ लाख ९२ हजारांच्या सेवाकराची नोंद करत गैरव्यवहार केला. २०२२-२३ मध्येही ७३ लाख ६३ हजारांचा घोटाळा केला. पोलिस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे तपास करत आहेत.