वीज केंद्रातील रोहित्र जळाले

By Admin | Updated: June 9, 2014 01:11 IST2014-06-09T00:44:52+5:302014-06-09T01:11:24+5:30

पालम : तालुक्यातील फरकंडा येथील वीज कंपनीच्या उपकेंद्राचे रोहित्र जळून खाक झाले आहे़

Burning power plant in the power station | वीज केंद्रातील रोहित्र जळाले

वीज केंद्रातील रोहित्र जळाले

पालम : तालुक्यातील फरकंडा येथील वीज कंपनीच्या उपकेंद्राचे रोहित्र जळून खाक झाले आहे़ यामुळे मागील चार दिवसांपासून सात गावांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे़ वीजपुरवठा खंडित झाल्याने या परिसरातील कृषी पंप बंद पडले आहेत़
फरकंडा येथे परिसरातील गावांना वीजपुरवठा करण्यासाठी वीज कंपनीचे ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित आहे़ या उपकेंद्राकडे कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने नेहमीच तांत्रिक बिघाड होत आहेत़ या केंद्रातून आजूबाजूच्या सात गावांना व शेतातील कृषीपंपांना विजेचा पुरवठा केला जातो़ फरकंडा गावाला वीजपुरवठा करणारे रोहित्र तर मागील महिनाभरापासून जळाले आहे़ ३३ केव्ही उपकेंद्रातील रोहित्र व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे़ फरकंडा, जवळा, गुळखंड, डिग्रस, सावंगी थडी, बरबडी या गावांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झालेले आहे़
या उपकेंद्रातील ब्रेकर व केव्हीसीटी खराब झाल्याने तांत्रिक बिघाड होऊन वायर तुटण्याचे प्रमाणही वाढले आहे़ चार दिवसांपासून सात गावांत पूर्णत: अंधाराचे साम्राज्य निर्माण झालेले आहे़ तसेच गोदाकाठावरील कृषीपंपही बंद पडल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे़ या बिघाडाकडे वीज कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांपुढील अडचणी वाढत आहेत़
वीज कंपनीने तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, नवीन रोहित्र बसवावे, अशी मागणी चंद्रकांत पौळ, राम पौळ, देवीदास पौळ, सोपान पौळ, अंगद पौळ, भारत पौळ, अनंता पौळ, विष्णू पौळ, दिगांबर पौळ आदींसह ग्रामस्थांनी केली आहे़ (प्रतिनिधी)
कायमस्वरुपी कर्मचारी मिळेना
फरकंडा येथे ३३ केव्ही उपकेंद्र असूनही या भागातील नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे़ उपकेंद्रात देखभाल करण्यासाठी वीज कंपनीचा कायमस्वरुपी एकही कर्मचारी नाही़
अनेक दिवसांपासून कायमस्वरुपी कर्मचारी नसल्याने तांत्रिक बिघाडात वाढ होत आहे़ या उपकेंद्रात कर्मचाऱ्यांसाठी निवास, पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था नाही़ यामुळे काम करण्यास कर्मचारी धजावत नाहीत़
जीवितास धोका
येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मर हा ३़१५ एमव्हीए क्षमतेचा असल्यामुळे या भागातील नागरिकांना कमी दाबाचा वीजपुरवठा होत असतो़ तसेच या उपकेंद्रातील साहित्यही खराब झालेले आहे़
ब्रेकर आयसोलेटर बायपास केल्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे़ तसेच रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे़ खराब साहित्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे़

Web Title: Burning power plant in the power station