उदंड जाहल्या संघटना..!

By Admin | Updated: January 18, 2015 00:30 IST2015-01-18T00:21:45+5:302015-01-18T00:30:31+5:30

दत्ता थोरे , लातूर सामाजिक सेवेच्या नावाखाली सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे संस्था, संघटनांची नोंदणी करुन गोरखधंदा मांडणाऱ्या संघटनांची लातुरात वाढ झाल्याचे आकडेवारीवरुनच पुढे येत आहे

The booming organization ..! | उदंड जाहल्या संघटना..!

उदंड जाहल्या संघटना..!



दत्ता थोरे , लातूर
सामाजिक सेवेच्या नावाखाली सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे संस्था, संघटनांची नोंदणी करुन गोरखधंदा मांडणाऱ्या संघटनांची लातुरात वाढ झाल्याचे आकडेवारीवरुनच पुढे येत आहे. आतापावेतो जिल्ह्यात २२ हजार ६५४ संस्था-संघटनांनी नोंदणी केली असून हा ‘गनिमी कावा’ नोंदणीच्या फार्सपुरताच दिसतो आहे. कारण यातील २० टक्के संस्था, संघटनांच पुढे आॅडीटला पुन्हा सहाय्यक धर्मादाय आयुक्ताचे कार्यालय गाठतात. बाकीचे जातात कुठे ? असा प्रश्न आहे.
जिल्ह्यात अनेक चांगले काम करणाऱ्या संस्था आणि संघटना आहेत. मात्र तरीही गनिमी कावा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रतापानंतर ‘लोकमत’ने जिल्ह्यात संस्था, संघटनांची नोंदणी तरी किती आहे, याचा शोध घेतला. यात जिल्ह्यात डिसेंबर अखेर तब्बल २२ हजार ६५४ संस्थांची नोंदणी झाल्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नोंदणी झालेल्या संस्थांपैकी याच कार्यालयाकडे आॅडीट दाखल करायला येणाऱ्या संस्था, संघटनांचे प्रमाण किती तर अवघे २० टक्केच आहे. मग बाकीच्या संस्था पुढे जातात कुठे आणि करतात काय ? असा यक्षप्रश्न आहे.
धर्मादाय आयुक्ताकडे आपल्या संस्था अगर संघटनेची नोंदणी करुन देण्याचे गुत्ते घेणाऱ्या काही व्यक्ती परिसरात घुटमळत असतात. एका ठराविक आकड्यात पैसा घेतला की हे लोक संघटनेच्या नावाची फाईल तयार करुन, नोंदणी करुन त्यांची दोन प्रमाणपत्रे मिळवून देईपर्यंतचा पाठपुरावा करुन थेट हातात आणून देतात. त्यामुळे अनेक संघटनावाल्यांना आपल्या संस्थेच्या घटनेत काय आहे ? याचीही माहिती नसते.
जात कोणतीही असो... महापुरुष कोणताही असो... परंतु या संघटनांचा त्रास मात्र व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स आणि राजकीय लोकांनाही होतो आहे. संघटनेने कोणताही कार्यक्रम घ्यायचा किंवा सामाजिक उपक्रम राबवायचा हे ठरविले की याचे पैसे गोळा करण्यासाठी अक्षरश: खंडणीसारखे पैसे उकळले जातात. याचा त्रास जिल्ह्यातील क्लासेसवाले, व्यापारी, उद्योजक, अधिकारी आणि राजकीय नेत्यांनाही वाढला आहे. सामाजिक कार्याची ओळख सांगणाऱ्या या संघटना उदंड झाल्या आहेत.

Web Title: The booming organization ..!