बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग झाल्यावर शिक्कामोर्तब, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:55 IST2025-07-02T18:51:00+5:302025-07-02T18:55:01+5:30

बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंगमुळे या ऐतिहासिक लेणीला धोका निर्माण होत असल्याने इतिहासप्रेमींनी संताप व्यक्त केला.

Blasting in the Buddha Cave area has been sealed, orders have been issued to register a case | बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग झाल्यावर शिक्कामोर्तब, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग झाल्यावर शिक्कामोर्तब, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात विनापरवानगी ब्लास्टिंग झाल्याच्या वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. याप्रकरणी संबंधित जमीनमालकांवर तत्काळ गुन्हा दाखल करून ‘एफआयआर’च्या प्रतीसह अहवाल सादर करण्याचे आदेश प्रभारी अपर तहसीलदार डाॅ. परेश चौधरी यांनी मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंगमुळे या ऐतिहासिक लेणीला धोका निर्माण होत असल्याने इतिहासप्रेमींनी संताप व्यक्त केला. यासंदर्भात ‘लोकमत’ने २७ जून रोजी ‘बुद्ध लेणीला हादरे, अवैध ब्लास्टिंग रोखणार कोण?’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची खंडपीठाने दखल घेतली आणि ते ‘सुमोटो’ जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतली. याप्रकरणी नेमलेल्या समितीने संयुक्तरीत्या पाहणी केली. तेव्हा मौजे हर्सूल शिवारातील सर्व्हे नं. २३४ मध्ये कणखर दगड कृत्रिमरीत्या फोडून जागेवर बसवलेले दिसून आले. याच गटातील पुढील जागेची पाहणी केली असता, दगडाचे बारीक तुकडे दिसून आल्याने सदर जमीनधारकाने सदर ठिकाणी ब्लास्टिंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे प्रभारी अपर तहसीलदारांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे. याप्रकरणी संबंधित जमिनमालकांना अवैधरीत्या ब्लास्टिंग केल्याप्रकरणी नोटीस देऊन खुलासा मागण्यात आला. सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्याने तो नामंजूर करण्यात आला.

परवानगी नसताना ब्लास्टिंग
ग.नं. २३४ च्या संबंधित जमिनीमालकांनी परवानगी नसताना ब्लास्टिंग केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे संबंधित जमीनमालकांवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात यावा. गुन्हा दाखल करून अहवाल सादर करावा, असे आदेश प्रभारी अपर तहसीलदार डाॅ. परेश चौधरी यांनी मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Web Title: Blasting in the Buddha Cave area has been sealed, orders have been issued to register a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.