बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; चार जमीनधारकांवर गुन्हा दाखल, एकाला अटक, दोघे पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 11:49 IST2025-07-04T11:47:05+5:302025-07-04T11:49:26+5:30

लोकमत इॅम्पॅक्ट : महसूलच्या वतीने ग्राम महसूल अधिकाऱ्यांची फिर्याद; एफआयआरमध्ये ‘लोकमत’च्या बातमीचा संदर्भ

Blasting in Buddha Caves area; Case registered against four landowners, one arrested, two absconding | बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; चार जमीनधारकांवर गुन्हा दाखल, एकाला अटक, दोघे पसार

बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; चार जमीनधारकांवर गुन्हा दाखल, एकाला अटक, दोघे पसार

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग केल्याच्या धक्कादायक प्रकारात अखेर स्फोट घडवणाऱ्या चार जमीनधारकांवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी एकाला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.

जीवनलाल कुंदनलाल डोंगरे, पृथ्वीराज कुंदनलाल डोंगरे, प्रेमराज कुंदनलाल डोंगरे व हंसराज कुंदनलाल डोंगरे (सर्व रा. तारकस गल्ली, बेगमपुरा), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील प्रेमराजला अटक केल्याचे निरीक्षक जगताप यांनी सांगितले. महसूल प्रशासनाच्या वतीने तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी दगडू जरारे (५४) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग केल्याने या ऐतिहासिक लेणीला धोका निर्माण होत असल्याने इतिहासप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने २७ जून रोजी ‘बुद्ध लेणीला हादरे, अवैध ब्लास्टिंग रोखणार कोण?’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची खंडपीठाने दखल घेतली आणि ते ‘सुमोटो’ जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतली. खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी केली. जरारे यांनी तक्रारीत नमूद माहितीनुसार, ‘लोकमत’च्या वृत्तानंतर त्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करण्याचा आदेश दिला. पाहणीत आरोपींच्या सर्व्हे क्रमांक २३४ मधील जमिनीवर कणखर दगड फोडल्याचे दिसून आले. परिसरात दगडाचे बारीक तुकडेदेखील होते. डोंगरे कुटुंबाला याबाबत विचारणा केल्यावर त्यांच्याकडे स्फोटासाठी कुठलीही परवानगी नसल्याचे समोर आले.

प्रशासनाने जमिनीविषयी माहिती मिळवली
चारही आरोपींनी जमीन सपाटीकरणाची परवानगी मिळाल्याचे सांगितले. सदर पडीत जमीन चौघांच्या सामाईक क्षेत्रातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महसूल विभागाने सदर घटनेचा पंचनामा केला. मंडळ अधिकारी कल्याण वानखरे यांच्या आदेशावरून जरारे यांनी फिर्याद दाखल केली.

काय ठेवलाय ठपका?
आरोपींवर बारीपदार्थ अधिनियम १९०८ अंतर्गत ३(अ), बीएनएस १२५ व २८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील शाळा, नागरिकांच्या मालमत्तांना हानी पोहोचवून जीवितास धोका निर्माण होईल, असे बेकायदेशीर व हलगर्जीपणाचे कृत्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. एफआयआर दाखल करताना तक्रारीत ‘लोकमत’च्या बातमीचा संदर्भ देण्यात आला आहे.

एकास अटक, बाकी पसार
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींपैकी प्रेमराज डोंगरे याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले. दरम्यान, अन्य आरोपी पसार झाले असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे जगताप यांनी स्पष्ट केले.

Web Title: Blasting in Buddha Caves area; Case registered against four landowners, one arrested, two absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.