बंडखोरीच्या धास्तीने भाजपचा अनोखा फॉर्म्युला; सर्व इच्छुक प्रभागांत एकत्र फिरण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 20:00 IST2025-12-15T19:59:15+5:302025-12-15T20:00:14+5:30
इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे भाजपच्या कोअर कमिटीने धास्ती घेतली आहे.

बंडखोरीच्या धास्तीने भाजपचा अनोखा फॉर्म्युला; सर्व इच्छुक प्रभागांत एकत्र फिरण्यास सुरुवात
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुका नवीन वर्षांत होण्याची दाट शक्यता आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी प्रचारही सुरू केला आहे, परंतु भारतीय जनता पक्षातील सगळे इच्छुक एकत्रितरीत्या प्रभागात फिरून मतदारांच्या भेटी घेत आहेत. बंडखोरीच्या धास्तीने भाजपने एकत्र फिरण्याचा अनोखा फॉर्म्युला आणला आहे. एकेका प्रभागात २५ ते ३० जण इच्छुक आहेत. ते सगळे सोबत मिळूनच मतदारांपर्यंत जात आहेत. भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी हा अनोखा प्रचार फॉर्म्युला आणला आहे.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान फुलंब्री मतदारसंघातून शितोळे यांच्यासह कृउबा सभापती राधाकिसन पठाडे, माजी महापौर भगवान घडमोडे, सुहास शिरसाट आदी डझनभर इच्छुकांना विधानसभेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. उमेदवारी अंतिम होईपर्यंत शितोळे यांच्यासह सर्व उमेदवार एकत्रितपणे सगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली, तसेच मतदारांच्या भेटी घेतल्या. उमेदवारी मिळविण्यात आणि आमदार होण्यात अनुराधा चव्हाण यांनी बाजी मारली. सगळे इच्छुक एकत्र असल्यामुळे बंडखोरी झाली नाही, तोच फॉर्म्युला शितोळे यांनी मनपा निवडणुकीच्या तोंडावर आणला आहे.
इच्छुकांना शहराध्यक्षांचा सल्ला
एकाच प्रभागात दहा ते वीस इच्छुक असून, त्या सर्वांनी एकत्र फिरून मतदारांच्या भेटी घ्याव्यात. आमच्यापैकी ज्याला पक्षाकडून उमेदवारी मिळेल, त्यालाच मतदान करावे. भाजपच्या इच्छुक उमेदवारांना प्रचार करताना, सर्वांनी एकत्र फिरावे. शहराध्यक्षांच्या सूचनांचे पालन करीत, इच्छुक उमेदवार मतदारांच्या भेटीला एकत्रपणे जात आहेत. मतदारांपर्यंत जाताना इच्छुकांमध्ये एकोपा राहत असून, कुणी-कुणाच्या विरोधात बोलत नाही. हसत खेळत प्रचार होत असल्याचा दावा शहराध्यक्ष शितोळे यांनी केला.
१८ प्रभागांत जास्त इच्छुक
इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे भाजपच्या कोअर कमिटीने धास्ती घेतली आहे. १४०० इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. एकेका इच्छुकांनी चार ते पाच प्रभागांतून अर्ज घेतले आहेत. तसेच १८ प्रभागांतच भाजपकडे उमेदवारांची संख्या जास्त आहे. उर्वरित ११ प्रभागांत उमेदवार नाहीतच, अशी अवस्था आहे. त्यातच शिंदेसेनेकडेदेखील १८ प्रभागांतूनच उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महायुतीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपाइं आठवले गट, शिंदेसेना यांच्यात प्रभागनिहाय वाटाघाटी होताना १८ प्रभागांमध्येच रस्सीखेच होईल.