मुलीकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला हायवाने उडविले; बाप-लेक ठार, आई गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 20:10 IST2025-10-04T20:09:37+5:302025-10-04T20:10:11+5:30
वैजापूर-श्रीरामपूर रोडवरील खंडाळा शिवारात झाला अपघात

मुलीकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला हायवाने उडविले; बाप-लेक ठार, आई गंभीर
वैजापूर : हायवाने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत बापासह मुलीचा मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हा भीषण अपघात शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वैजापूर-श्रीरामपूर रोडवरील खंडाळा शिवारात घडला. अयूब मुनीर शहा (वय ४६), अश्मिरा अयूब शहा (वय १२) अशी मयतांची नावे असून, अंजुम अयूब शहा (वय ३५, सर्व रा. बोलठाण) या जखमी आहेत.
वैजापूर तालुक्यातील बोलठाण येथील रहिवासी अयूब शहा हे पत्नी अंजूम व मुलगी अश्मिरा यांना घेऊन दुचाकीने दुसऱ्या मुलीला भेटण्यासाठी श्रीरामपूर येथे निघाले होते. दरम्यान, खंडाळा गावाजवळ रोटी वस्तीजवळ शुक्रवारी सकाळी ११ वाजता भरधाव आलेल्या हायवाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात अयूब शहा व मुलगी अश्मिरा यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता, की हायवाचे चाक अंगावरून गेल्याने अयूब यांच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे पोकॉ किसन गवळी, आर. टी. सुके, त्र्यंबक बुधवत यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना बाबासाहेब वाळुंज, शिवाजी लांडे, अविनाश आहेर, सुयोग हिंगे, अतुल निर्मळ, मयूर लांडे यांनी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रस्त्याची अवस्था बिकट
वैजापूर श्रीरामपूर रस्त्याचे सध्या काम चालू आहे. पर्यायी रस्ता नसल्याने या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. एक बाजू खोदल्याने एकाच बाजूने मातीच्या पंख्यावरून वाहतूक सुरू आहे. त्यातच पावसाने मातीचा रस्ता खचला आहे. याच खराब रस्त्यावरून जाताना अयूब शहा व त्यांच्या मुलीला जीव गमवावा लागला.