छत्रपती संभाजीनगराला मोठा दिलासा; ३७०० एचपी पंपाची चाचणी यशस्वी, पाणीपुरवठा वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 19:04 IST2026-01-10T19:03:28+5:302026-01-10T19:04:54+5:30
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे

छत्रपती संभाजीनगराला मोठा दिलासा; ३७०० एचपी पंपाची चाचणी यशस्वी, पाणीपुरवठा वाढणार
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या व मंत्री अतुल सावे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे पूर्णत्वाकडे असलेल्या शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. जायकवाडी धरणावरून पाणीपुरवठा करण्यासाठी बसवलेल्या ३७०० हॉर्सपॉवर (एचपी) क्षमतेच्या शक्तिशाली पंपाची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या यशस्वी चाचणीमुळे शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर लवकरच मोठा दिलासा मिळणार असून, पुढील दोन महिन्यांत शहराला सातत्यपूर्ण आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२७४० कोटी रुपयांतून योजना होत आहे. सुरुवातीला १६८० कोटी रुपयांची मंजुरी मिळालेली, ही योजना नंतर सुधारित करून २७४० कोटींवर नेली गेली. केंद्र सरकारकडून खा. डॉ. भागवत कराड यांनी १ हजार कोटी रु. मिळविले. या योजनेमुळे शहराला पुढील २५-३० वर्षे नियमित शुद्ध पाणीपुरवठा होईल. पंपाची चाचणी यशस्वी झाल्याने पुढच्या दोन महिन्यांत शहरातील अनेक भागांना नियमित पाणी मिळू लागेल. त्यांनी योजनेच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी), महानगरपालिका, कंत्राटदारांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या यशस्वी चाचणीमुळे शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. योजनेचे उर्वरित कामही जलदगतीने पूर्ण होईल आणि मार्च २०२६ पर्यंत शहराला दररोज पाणीपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
पाणीपुरवठा १७१ एमएलडीपर्यंत वाढेल
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः या योजनेचा सातत्याने आढावा घेऊन अडथळे दूर केले. पालिकेच्या वाट्याच्या निधीसाठी राज्य सरकारने विशेष सहाय दिले. यामुळे योजना वेगाने पुढे सरकली असून, २०२३ मध्ये केवळ १८ टक्के प्रगती असताना २०२५ अखेरपर्यंत ती ८२ टक्क्यांवर पोहोचली. योजनेत जायकवाडी धरणातून पाणी उपसा करण्यासाठी ३७०० एचपी क्षमतेचे अत्याधुनिक पंप बसवण्यात आले. सप्टेंबर २०२५ मध्ये हे पंप बसवण्याचे काम पूर्ण झाले आणि आता त्याची चाचणी यशस्वी झाल्याने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. या पंपामुळे कच्च्या पाण्याची वाहतूक २५०० मिमी व्यासाच्या मुख्य पाईपलाईनद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत होईल. योजनेची एकूण क्षमता ३९२ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) असून, २०५२ पर्यंत शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवेल. सध्या १४५ एमएलडी पाणीपुरवठा होतो, जो लवकरच १७१ एमएलडीपर्यंत वाढेल.
- अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री