मोठी बातमी! ऑरिक सिटीत ‘एलएनके’चा ४ हजार ७०० कोटींचा सोलार पॅनल निर्मिती प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:00 IST2025-08-20T16:50:55+5:302025-08-20T17:00:01+5:30

२५०० युवकांना रोजगाराची संधी; एमआयटीएल व एलएनके ग्रीन एनर्जी प्रा.लि.मध्ये सामंजस्य करार

Big news! LNK's Rs 4,700 crore solar panel manufacturing project in Auric City | मोठी बातमी! ऑरिक सिटीत ‘एलएनके’चा ४ हजार ७०० कोटींचा सोलार पॅनल निर्मिती प्रकल्प

मोठी बातमी! ऑरिक सिटीत ‘एलएनके’चा ४ हजार ७०० कोटींचा सोलार पॅनल निर्मिती प्रकल्प

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात सौर ऊर्जा उत्पादनाला मोठी चालना मिळणार आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र इंडस्ट्रीयल टाउनशिप लि. (एमआयटीएल) आणि एलएनके ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात मुंबईत मंगळवारी सामंजस्य करार झाला. या कराराअंतर्गत ऑरिक सिटीत ६ गिगावॅट क्षमतेचा सोलार सेल व निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी कंपनी येथे ४ हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यातून २ हजार ५०० युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने स्वच्छ ऊर्जेच्या उत्पादनाला चालना दिली आहे. राज्यातील औद्योगिक वसाहतींना उच्च दर्जाचा ऊर्जा पुरवठा करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. उत्तर प्रदेशातील एलएनके ग्रीन एनर्जी प्रा. लि. ही कंपनी तब्बल ६ हजार मेगावॅट (६ गिगावॅट) क्षमतेचा सेल व मॉड्युल (सोलार पॅनल) उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. यासाठी कंपनी ४ हजार ७०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. प्रकल्पातून २,५०० लोकांना थेट व २,००० लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

यासंदर्भात एमआयटीएल आणि एलएनके ग्रीन एनर्जी यांच्यातील सामंजस्य करारावर मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी कंपनीचे संचालक वरुण कराड आणि राज्याचे उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगण उपस्थित होते.

ऑरिक सिटीमध्ये आधीच टोयटा-किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू, लुब्रिझोल, एथर एनर्जी, पिरमॅल फार्मा, कॉस्मो फिल्मस् या कंपन्यांनी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. काही कंपन्यांनी इमारत बांधकाम सुरू केले. येत्या दोन-तीन वर्षांत या मोठ्या कंपन्यांचे उत्पादन सुरू होणार आहे. अशा स्थितीत एलएनके ग्रीन एनर्जीचा सोलार पॅनल उत्पादन प्रकल्प ऑरिकमधील औद्योगिक आणि निवासी ग्राहकांसाठी स्वच्छ व शाश्वत ऊर्जा पुरवठा करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावर दिली माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर करीत एलएनके ग्रीन एनर्जी प्रा. लि. छत्रपती संभाजीनगरमध्ये सेल व मॉड्यूल उत्पादन प्रकल्प उभारणार असल्याची माहिती दिली. कंपनी आणि एमआयटीएल यांच्यातील सामंजस्य कराराचे छायाचित्रही मुख्यमंत्र्यांनी शेअर केले.

Web Title: Big news! LNK's Rs 4,700 crore solar panel manufacturing project in Auric City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.