बुद्ध लेणीवर उसळला भीमसागर; २५ एकरांत साकारणार विशुद्धानंद बोधी फाउंडेशनचा भव्य प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:31 IST2025-10-03T19:31:09+5:302025-10-03T19:31:44+5:30
अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर बाबासाहेबांनी या देशाचे संविधान लिहिले : प्रकाश आंबेडकर

बुद्ध लेणीवर उसळला भीमसागर; २५ एकरांत साकारणार विशुद्धानंद बोधी फाउंडेशनचा भव्य प्रकल्प
छत्रपती संभाजीनगर : ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध लेणीवर सकाळपासूनच भीमसागर उसळला होता. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये शेकडो नव्हे, हजारो नव्हे, लाखोंच्या संख्येने येऊन उपासक- उपासिकांंनी तथागतांचे व बुद्ध धम्माची दीक्षा देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनोभावे स्मरण केले. जयजयकारही केला. दरवर्षीप्रमाणेच बुद्ध लेणी परिसर नटला होता. शेकडो पुस्तकांची दुकाने थाटली गेली होती. अनेक ब्लड बँका रक्तदान करून घेण्यासाठी सज्ज झालेल्या होत्या, तर अनेक आंबेडकरी संघटना अन्नदानासाठी व पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या.
जमीन सरकारने स्वत:हून द्यावी : ॲड. आंबेडकर
बुद्ध लेणीच्या पायथ्याजवळील २५ एकरांत साकारण्यात येणारा विशुद्धानंद बोधी फाउंडेशनचा प्रकल्प सायंकाळी ॲड. बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लाँच करण्यात आला. या प्रकल्पासाठी पुढील वर्षांपर्यंत जमीन उपलब्ध झाली पाहिजे, असा आग्रह यावेळी ॲड. आंबेडकर यांनी धरला. या प्रकल्पांतर्गत तथागत गौतम बुद्ध व सम्राट अशोकांचे शंभर फुटी पुतळे उभारण्यात येणार आहेत. विशुद्धानंद बोधी महाविहाराची उभारणी करण्यात येणार आहे. आठ एकरांत बाग-बगीचा विकसित करून हे स्थळ पर्यटनस्थळ ठरावे, असे नियोजन आहे. ‘बुद्ध लेणी बचाव’ मोर्चा निघाल्यानंतर जागेसंबंधीचा प्रस्ताव सरकारकडेच पडून असल्याची खंत यावेळी भदंत विशुद्धानंद बोधी यांनी व्यक्त केली. ही जमीन सरकारने स्वत:हून द्यावी. प्रकल्प उभारावा असे वाटत असेल तर इथे एकवटलेली शक्ती मतपेटीतून दिसली पाहिजे, असे आवाहन बाळासाहेबांनी केले.
चारित्र्यवान बना......
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी सविस्तर भाषण केले. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचं संविधान लिहिलं असं त्यांनी नमूद केलं. त्यांनी सांगितले की, बुद्धीचा वापर करायला शिकलं पाहिजे. त्यासाठी ज्ञान पाहिजे. हिंमत पाहिजे. ज्ञान आणि हिंमत सत्ता देते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सत्तेमुळे समाजात काय पेरायचं हे ठरवता येते. शिवाय मतदान करताना विकले जाऊ नका असेही त्यांनी नमूद केले. प्रांतोष वाघमारे, दीपक निकाळजे व बाबा तायडे यांनी या सभेचे सूत्रसंचालन केले. भाषणापूर्वी बाळासाहेबांना समता सैनिक दलाने सलामी दिली.
‘मी रमाई बोलतेय’ ने मने जिंकली
बाळासाहेब आंबेडकर येण्यापूर्वी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ‘ घटनेच्या चौकटीत पोलिस दल चांगले काम करेल’ असे आश्वस्त केले. तत्पूर्वी प्रेरणा खरात या अभिनेत्रीने ‘ मी रमाई बोलतेय’ हे स्वगत सादर केले. ते ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. ज्योत्सना कांबळे यांनी प्रेरणाचे धम्मदान देऊन स्वागत केले. यानंतर उपस्थितांनी उभे राहून २२ प्रतिज्ञा ग्रहण केल्या.
भीमयुगाची पहाट....
भीमयुगाची पहाट या संचाचे मुख्य गायक प्रकाशदीप वानखडे, गायिका स्नेहल वानखडे व साक्षी वानखडे यांनी दुपारपासूनच लेणी परिसर बुद्ध व भीममय करून टाकला होता. तरुण गायक धम्म धन्वे यांनी ‘साऱ्या जगात कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरारा हाय’ हे गीत गाऊन धमाल उडवून दिली. साक्षी वानखडे हिने ‘लई बळ आलं, माझ्या दुबळ्या पोरात’ हे गीत सादर करुन प्रशंसा मिळविली. ॲड. बाळासाहेब आंबेडकर आल्यानंतर त्यांच्यासमोर मेघानंद जाधव यांनी ‘ मागे हटेना ही भीमसेना, बाळासाहेब आमचे सेनापती’ हे गीत खुबीने गायिले, तर प्रकाशदीप वानखडे यांनी स्वरचित ‘ बाळासाहेबांना पाहुनी भीम समाजाला दिसल्यासारखं वाटलं’ हे गीत गाऊन दाद मिळविली.
जाण्यायेण्याच्या मार्गावर अंधारच अंधार.....
विद्यापीठातून ज्या मार्गावरून बुद्ध लेणीकडे जायचे तिथे अंधारच होता. उपासक- उपासिका मोबाइलच्या टॉर्च लावून ये-जा करत होते. खरे तर विद्यापीठ प्रशासनाने प्रकाशाची सोय करायला हवी होती. एकतर लेणीकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद आहे. दोन्ही बाजूंंनी जत्थेच्या जत्थे जा- ये करीत असतात. हा रस्ता रुंद करण्याची गरज आहे. त्याचे साधे डांबरीकरणही केलेले नव्हते.