'थोडी झळ सहन करा'; लोडशेडिंगवर ऊर्जामंत्री नितीन राऊत स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 20:03 IST2022-04-11T20:01:54+5:302022-04-11T20:03:02+5:30
उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढल्याने ऐन उन्हाळ्यात काही प्रमाणात लोडशेडिंग सुरु झाले आहे.

'थोडी झळ सहन करा'; लोडशेडिंगवर ऊर्जामंत्री नितीन राऊत स्पष्टच बोलले
औरंगाबाद : वीज उपलब्ध होत नसल्याने व्होल्टेज मेंटेन करणेही त्रासदायक होत आहे. सध्या लोडशेडिंग थोड्याफार प्रमाणात सुरू झाले आहे. नागरिकांनी थोडी झळ सहन करावी, अशी अपेक्षा ऊर्जामंत्री नितीन राउत यांनी व्यक्त केली. एका कार्यक्रमासाठी शहरात आले असताना मंत्री राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढल्याने ऐन उन्हाळ्यात काही प्रमाणात लोडशेडिंग सुरु झाले आहे. येणाऱ्या काळातील वीज टंचाई आणि लोडशेडिंग यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात विजेचा तुटवडा आहे. एकीकडे विकत घायची म्हटली तर बाजारात विजेची उपलब्धता नाही. यासोबतच वीज विकत घेण्यासाठी पैसाही लागतो. वीज ग्राहकानी बिल देण्यास नकार दिला तर संपूर्ण वितरण कोसळेल, अशी शंकाही मंत्री राऊत यांनी व्यक्त केली. तसेच आता काही प्रमाणात लोडशेडिंग सुरु झाले आहे. नागरिकांनी थोडी झळ सहन करावी अशी अपेक्षाही मंत्री राऊत यांनी व्यक्त केली.
रात्री ‘लाईट’ का गेली? २८ हजार नागरिकांना ‘शाॅक’
औरंगाबाद शहरात सकाळी, दुपारी आणि सायंकाळनंतर आता रात्रीही नागरिकांना भारनियमनाचा ‘शाॅक’ बसत आहे. शहरात शनिवारी रात्री साडेदहा ते पहाटे ३ वाजेदरम्यान महावितरणकडून २४ फीडरवर भारनियमन करण्यात आले. कुठे दोन तास तर कुठे तासभर वीजपुरवठा खंडित राहिला. एका फीडरवर १२०० ते १५०० वीज ग्राहक असतात. यानुसार किमान २८ हजार वीज ग्राहकांवर घामाघूम होण्याची वेळ ओढवली. औरंगाबाद शहराला तब्बल ३ वर्षांनंतर ऐन उन्हाळ्यात पुन्हा एकदा भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे.