औरंगाबाद पुन्हा हादरले; पती-पत्नीची निर्घृण हत्या, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 12:44 IST2022-05-23T11:05:25+5:302022-05-23T12:44:38+5:30
घटनेपासून मुलगा फरार असून त्या दृष्टीने पोलीस तापस करत आहेत.

औरंगाबाद पुन्हा हादरले; पती-पत्नीची निर्घृण हत्या, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
औरंगाबाद : शहरातील पुंडलिक नगर येथे आज सकाळी घरात दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दाम्पत्याची हत्या केल्यानंतर आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी शहरात एका तरुणीची एकतर्फी प्रेमातून चाकूने भोसकून खून केल्याची घटना ताजी असतानाच दांपत्याच्या हत्येची घटना पुढे आल्याने शहर पुन्हा हादरून गेले आहे. भांडे व्यापारी शामसुंदर हिरालाल कलंत्री ( ५५) आणि किरण शामसुंदर कलंत्री (४५ ) अशी मृतांची नावे आहेत. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह घराबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कलंत्री यांच्या घराला कुलूप आहे आणि घरामधून दुर्गंधी येत असल्याची माहिती सविता सातपुते यांना पोलिसांना कळवली. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता पती-पत्नीचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाखाली लपवून ठेवल्याचे यावेळी निदर्शनास आले. दरम्यान, मुलगा आकाश या घटनेपासून फरार असून त्याचा मोबाईल बंद येत आहे. याशिवाय मुलाने एसबी महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या बहिणीला शनिवारी धुळ्याच्या नातेवाईकांचा अपघात झाला आहे आम्ही तिकडे जात आहोत, तू मावशी सविताकडे जा, असे सांगितले. यानंतर मुलगी तिच्या काकाकडे गेली ही माहिती पुढे आली आहे. यामुळे पोलिसांचा तपास या दृष्टीने सुरू आहे. मात्र, शहरात लागोपाठ होणाऱ्या हत्यांचे सत्र चिंताजनक ठरत आहे.
कुलूप पाहून मुलगी परतली
आई वडिलांचा मोबाईल बंद लागत असल्यामुळे चिंतेने काल दुपारी मुलगी घरी परतली होती. मात्र दाराला कुलूप असल्याने सविता सातपुते या ओळखीच्या मानलेल्या मावशीच्या घरी राहिली. आज सकाळी ती पुन्हा घरी आली तेव्हा घरातून दुर्गंधी येत होती. यामुळे संविता यांनी पोलिसांना घटना कळविली, पोलिसांनी दार तोडून आत जाऊन पाहिले असता घटना उघडकीस आली.
मुलाने शेजाऱ्याकडून नेले 2 हजार रुपये
आकाश हा रविवारी सकाळी 8 वाजता कॉलनीत आला होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या योगेश नाशिककर यांच्याकडून त्याने 2 हजार रुपये नेल्याचे समोर आले. मयताच्या फोनवरून कॉलकरून आकाशला 2 हजार रुपये द्या असे योगेश यांना सांगण्यात आले. मात्र, तो आवाज मयत कलंत्री यांचा नव्हता असे योगेश यांचे म्हणणे आहे.