शहर पोलिसांना हव्यात सहा स्पीडगन; सुसाट जाणाऱ्या वाहनांना लगाम घालण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 17:31 IST2019-06-25T17:28:51+5:302019-06-25T17:31:16+5:30
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरवर्षी लहान मोठे सरासरी दीड हजार अपघात घडतात.

शहर पोलिसांना हव्यात सहा स्पीडगन; सुसाट जाणाऱ्या वाहनांना लगाम घालण्याचा विचार
औरंगाबाद : वाऱ्याच्या वेगाने वाहने पळविणाऱ्या शहरातील वाहनचालकांना वेसण घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने पोलीस महासंचालक कार्यालयाकडे सहा स्पीडगनची मागणी केली आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरवर्षी लहान मोठे सरासरी दीड हजार अपघात घडतात. वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसणे, वाहतूक नियम न पाळल्याने अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या कमी करण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून सतत प्रयत्न केले जातात.
पोलीस आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी एक अधिसूचना जारी करून शहरातील वाहनाचा वेग प्रतितास ४० कि़ मी. असा निश्चित केला. तेव्हापासून शहरातील कोणत्याही वाहनचालकाला त्याचे वाहन ४० कि.मी. प्रतितास अशी वेगमर्यादा पाळणे बंधनकारक आहे. असे असताना सुसाट वाहनचालक वेगमर्यादा पाळत नसल्याचे समोर आले. सुसाट वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने दोन वर्षांपूर्वी तीन स्पीडगन खरेदी केले होते. मात्र यापैकी दोन स्पीडगन कायमस्वरुपी नादुरुस्त झाले. स्पीडगन अधूनमधून खराब होत असते. शिवाय दुरुस्तीनंतरही या स्पीडगन वारंवार खराब होत असतात. कधी त्यातून प्रिंट निघत नाही तर कधी त्यातून अचूक मोजमाप होत नाही. यामुळे या स्पीडगनचा वापर करणेही पोलिसांनी थांबविले आहे. प्रभावी कारवाई करता यावी, याकरिता पोलीस आयुक्तालयाने सहा स्पीडगनची मागणी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे केल्याची माहिती उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.
चार स्पीडगन मिळण्याची अपेक्षा
याविषयी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, वाहनाची वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी स्पीडगनची आवश्यकता आहे. जुन्या स्पीडगन नादुरुस्त झाल्याने नवीन सहा स्पीडगन पोलीस आयुक्तालयास द्याव्या, अशी मागणी पोलीस महासंचालक कार्यालयास करण्यात आली.