Aurangabad Accident: भरधाव ट्रॅक्टर दुभाजकावर धडकून उलटला; एक ठार, दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 20:00 IST2022-06-28T19:59:31+5:302022-06-28T20:00:15+5:30
Aurangabad Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर दुभाजकावर धडकून विरुध्द दिशेने उलटला

Aurangabad Accident: भरधाव ट्रॅक्टर दुभाजकावर धडकून उलटला; एक ठार, दोघे जखमी
वाळूज महानगर : भरधाव ट्रॅक्टर दुभाजकाला धडकून उलटल्याने या ट्रॅक्टरखाली दबून एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाळूजजवळ घडली. या अपघातात पांडुरंग रतन सूर्यवंशी (२५ रा. लिंबे जळगाव) हे ठार तर धोंडाबाई सूर्यवंशी व कृष्णा बर्डे हे दोघे जखमी झाले.
कृष्णा बर्डे हा शेख नजीर यांच्या ट्रॅक्टर (क्र. एम.एच.२०, ए.एस.६२४६) वर चालक म्हणून काम करतो. मंगळवारी दुपारी कृष्णा ट्रॅक्टर घेऊन पंढरपूरहून लिंबे जळगावच्या दिशेने जात होता. वाळूज गावात कृष्णाच्या ओळखीचे धोंडाबाई व पांडुरंग हे मायलेक दिसल्याने कृष्णाने ट्रॅक्टर थांबवून या दोघांना चालकाच्या शेजारी बसविले. वाळूजपासून काही अंतर पुढे गेल्यानंतर पांडुरंग हा ‘मी ट्रॅक्टर चालवतो’ असे म्हणून स्टिअरिंगवर बसला. वाळूजजवळील बडवे कंपनीसमोर पांडुरंगचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून तो दुभाजकावर धडकून विरुध्द दिशेने उलटला.
ट्रॅक्टरखाली दबल्याने पांडुरंग गंभीर जखमी झाला. धोंडाबाई व कृष्णा रस्त्यावर पडून जखमी झाले. माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे उपनिरीक्षक हनीफ सय्यद, पोहेकॉ. अभिमन्यू सानप, वाहतूक शाखेचे पोहेकॉ. देवीदास दहीफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून पांडुरंगला मयत घोषित केले. पुढील तपास उपनिरीक्षक हनीफ सय्यद करीत आहेत.