पैठणमध्ये लाखो वारकऱ्यांचा विठ्ठल नामाचा गजर, दमदार पावसासाठी घातले साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 06:40 PM2023-06-29T18:40:49+5:302023-06-29T18:41:17+5:30

जयघोषाने पैठण नगरी दुमदुमली; आषाढी एकादशीच्या पर्वावर पैठणला दिवसभरात तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

Ashadhi Ekadashi : In Paithan, lakhs of pilgrims called Vitthal have been alerted for heavy rains | पैठणमध्ये लाखो वारकऱ्यांचा विठ्ठल नामाचा गजर, दमदार पावसासाठी घातले साकडे

पैठणमध्ये लाखो वारकऱ्यांचा विठ्ठल नामाचा गजर, दमदार पावसासाठी घातले साकडे

googlenewsNext

पैठण: 
आता कोठे धावे मन,  तुझे चरण देखिले आज || 
भाग गेला शीण गेला,  अवघा झाला आनंद ।! 

या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रचिती गुरुवारी नाथनगरीत ठायीठायी येत होती.आषाढी एकादशीच्या पर्वावर देहभान विसरून मोठ्या श्रध्देने नाथांच्या समाधीवर डोके ठेवताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील तृप्त भाव वातावरणातील चैतन्य व वारकरी संप्रदायाची थोरवी अधोरेखित करून जात होती. यंदा वारकऱ्यांनी आषाढी वारीला विक्रमी गर्दी केल्याने अवघी पैठण नगरी विठुनामाच्या गजराने आज दुमदुमून निघाली. 

देवशयनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर  लाखो वारकरी व भाविकांनी पैठण येथे नाथ समाधीचे दर्शन घेत चांगला पाऊस पडू दे, बळिराजाची ईडा पिडा दूर होऊ दे असे साकडे नाथ महाराजा मार्फत पांडुरंगास घातले . वैष्णवांच्या गर्दिने पैठण शहर व गोदेचा काठ गुरुवारी गजबजून गेला, बघावे तिकडे हरिनामाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष सुरू होता. दिवसभरात तीन लाखापेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले रात्री उशिरापर्यंत मंदीरा बाहेर दर्शनाची रांग कायम असल्याचे दिसून आले. 

आषाढी एकादशीला जे वारकरी भाविक पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकत नाही वा पंढरपूरला जे जाऊ शकले नाही, असे वारकरी पैठण येथे येउन गोदावरीचे स्नान करून नाथांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतात. शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. यंदाही  लाखो भाविकांनी पैठण येथे हजेरी लावली. दर्शनासाठी तब्बल चार ते पाच तासाचा अवधी लागत होता.तहान भूक हरपून दर्शनाच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा उत्साह दिवसभर टिकून होता.

दुपारी आलेल्या पावसानेही भाविक विचलित झाले नाही. हातात टाळ घेऊन मृदंगाच्या तालावर नाचत, गर्जत, विठ्ठलनामाचा जयघोष करीत वारकरी पायी वाटचाल करत पैठण नगरीत दाखल होत होते. भजन गात, गर्जत, नाचत पैठण मधे आलेल्या वारकऱ्यांच्या दिंडया म्हणजे चैतन्याचा प्रवाह....या दिंडयांचे दर्शनही चित्त प्रसन्न करणारे असेच होते.  

आज पहाटे ३ वाजेपासून  पैठण शहरात वारकरी व भाविकांचे आगमन सुरू झाले, गळ्यात  माळ, डोक्यावर तुळशी वृंदावन, डोळ्यात पांडुरंगाच्या दर्शनाची आस, सोबत भानुदास एकनाथाचा जय घोष करत महिला वारकऱ्यांनी मोठ्या संखेने हजेरी लावली. टाळमृदंगाच्या गजरात हातात भगवा ध्वज घेऊन, माथ्यावर गोपीचंदनाचा टिळा लावलेले वारकरी मोठ्या जल्लोषात विठुरायाचा जयघोष करत होते. 

भाविक झाले व्याकुळ ! 
नाथ समाधी समोर दर्शन घेताना आज वारकरी मोठे भावूक झाल्याचे दिसून आले. पावसास उशीर झाल्याने खरिपाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. यामुळे काळजीत असलेल्या वारकऱ्यांनी " नाथबाबा चांगला पाऊस पडू द्या, आमच्या पांडुरंगाचे हात आभाळाला लावा" अशी समाधीसमोर व्याकुळ होत विनवणी केली, दिवसभर अनेक वारकऱ्यांनी ओल्या नजरेने आपले दु:ख नाथसमाधी समोर व्यक्त केले व मोठ्या समाधानाने पैठणचा निरोप घेतला. नामाच्या या गजराने पैठण नगरीत मंगलमय वातावरण झाले होते. आज आतिल व बाहेरील नाथमंदीरात भाविकांना दर्शन सुरळीत घेता यावे म्हणून नाथसंस्थानचे कार्यकारी विश्वस्त बारीक लक्ष ठेवून होते.  शिवाय पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, , सहायक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, फौजदार सतिश भोसले, दशरथ बरकुल, सुधीर वाव्हळ, भगवान धांडे, मनोज वैद्य,  यांच्या मार्गदर्शनाखाली आतील व बाहेरील नाथमंदीरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

गोदावरीत पाणी सोडले
एकादशीसाठी जायकवाडी धरणातून गुरूवारी पहाटे ५२४ क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले.भाविकांना स्नानासाठी गोदापात्रात शुध्द पाणी मिळाले. दुपारपर्यंत गोदावरीच्या विविध घाटावर भाविक व वारकऱ्यांनी गोदास्नानाचा आनंद घेतला.  

Web Title: Ashadhi Ekadashi : In Paithan, lakhs of pilgrims called Vitthal have been alerted for heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.