सलाईन लावण्यावरून वाद; जिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांना नातेवाइकाची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:11 IST2025-05-27T13:11:16+5:302025-05-27T13:11:50+5:30
रुग्णालयात काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

सलाईन लावण्यावरून वाद; जिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांना नातेवाइकाची मारहाण
छत्रपती संभाजीनगर : रुग्णाला लावलेली सलाईन ‘आऊट’ झाल्यानंतर ती पुन्हा टोचण्यावरून वाद घालत रुग्णाच्या नातेवाइकाने निवासी डाॅक्टरला मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. या घटनेनंतर निवासी डाॅक्टरांच्या मार्ड संघटनेने संताप व्यक्त करीत रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत तक्रार करावी, अन्यथा जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांची पोस्टिंग नाकारली जाईल, असा पवित्रा घेतला.
जिल्हा रुग्णालयात मेडिसीन विभागाच्या वार्ड क्रमांक-२०३ मध्ये एका महिलेवर उपचार सुरू आहेत. महिला रुग्णाला लावलेली सलाईन ‘आऊट’ झाल्यानंतर ती पुन्हा टोचण्यावरून रुग्णाच्या नातेवाइकांनी कर्तव्यावरील निवासी डाॅक्टरसोबत वाद घातला आणि मारहाण केली. डाॅक्टरांनी या प्रकाराचा व्हिडिओ काढला. तेव्हाही नातेवाइकाने शिवीगाळ केली. त्यामुळे रुग्णालयात काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
‘डीएमओं’कडून पोलिसांत तक्रार
रुग्णाच्या नातेवाईक आणि निवासी डाॅक्टरमध्ये वाद झाला. याप्रकरणी ड्युटी मेडिकल ऑफिसर (डीएमओ) यांच्याकडून पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे.
- डाॅ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक
... तर जिल्हा रुग्णालयात पोस्टिंगला जाणार नाही
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाकडून गंभीरता न दाखविता संबंधित डॉक्टरनेच स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी, असा सल्ला देण्यात आला. ही भूमिका अत्यंत निषेधार्ह असून, डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती धोकादायक ठरू शकते. २४ तासांत एफआयआर नोंदवला नाही, तर जिल्हा सामान्य रुग्णालयात आम्ही पोस्टिंगसाठी जाणार नाही.
- डाॅ. ऋषिकेश देशमुख, अध्यक्ष, मार्ड संघटना