बोगस 'IAS' कल्पनाचा आणखी एक कारनामा; आर्थिक व्यवहारात ठाकरेसेनेच्या खासदाराचे नाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:37 IST2025-12-03T13:34:44+5:302025-12-03T13:37:18+5:30
पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाईल महिलेच्या खात्यात खासदार नागेश पाटील आष्टीकरांकडून १ लाख ४५ हजार रुपये जमा

बोगस 'IAS' कल्पनाचा आणखी एक कारनामा; आर्थिक व्यवहारात ठाकरेसेनेच्या खासदाराचे नाव!
छत्रपती संभाजीनगर: शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा महिन्यांपासून मुक्कामी असलेल्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या बोगस आयएएस अधिकारी कल्पना भागवत या महिलेच्या 'पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कनेक्शन'मुळे खळबळ उडाली असतानाच, या प्रकरणात आता ठाकरे सेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव समोर आले आहे. या महिलेच्या बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्या ११ जणांच्या यादीत खासदार आष्टीकर यांचा समावेश असून, त्यांनी महिलेला एक लाख ४५ हजार रुपये दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
नेमके प्रकरण काय?
कल्पना भागवत हिला बनावट कागदपत्रांच्या आधारे हॉटेलमध्ये मुक्काम केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तिच्या अटकेनंतर तिच्या खात्यातील आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता तिचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांशी तसेच अफगाण प्रियकराशी संबंध असल्याचे उघड झाले. तिच्या खात्यात विविध स्रोतांतून ३२ लाख ६८ हजार ८६२ एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचे पोलिसांच्या रिमांड अर्जात नमूद आहे.
खासदारांकडून 'माणुसकी'च्या नात्याने मदत
पोलिसांना तपासामध्ये कल्पना भागवत हिला पैसे देणाऱ्यांमध्ये खासदारांचे नाव आढळले. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी या महिलेला वेगवेगळ्या वेळी एक लाख ४५ हजार रुपये दिल्याचे मान्य केले आहे. खासदार आष्टीकर यांनी स्पष्ट केले की, कल्पना भागवतने त्यांना राम भद्राचार्य महाराज यांची भक्त असल्याचे सांगत संपर्क केला होता. तिने आयएएससाठी निवड झाली पण वडील वारल्याने ट्रेनिंगला जाता आले नाही, आई आजारी आहे, अपघात झाला किंवा मंदिर बांधायचे आहे अशी वेगवेगळी कारणे सांगून सहानुभूती मिळवली. त्यांनी ही रक्कम 'कोणीतरी मदत मागितली म्हणून केवळ माणुसकीच्या नात्याने' दिल्याचे सांगितले. रक्कम मोठी नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यवहार की माणुसकी गूढ कायम!
कल्पना भागवत हिच्या खात्यात पैसे देणाऱ्यांमध्ये अफगाणिस्तानातील व्यक्ती अशरफ खिल (२ लाख ३१ हजार रुपये) सह सुंदर हरी उर्फ सुरेश जैन, अभिजीत क्षीरसागर, दत्तात्रय शेटे (७ लाख ८५ हजार रुपये) आणि रमेश मुळे यांसारख्या अन्य व्यक्तींचाही समावेश आहे. या महिलेचे विदेशी नागरिकांशी आणि त्यांच्या पारपत्रांशी संबंधित व्यवहार असल्याने, या व्यवहारामागील नेमके कारण काय होते, तसेच हे व्यवहार कोणत्या कारणांसाठी होते, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे कोठडीची मागणी केली होती. या हायप्रोफाईल गुन्ह्यात थेट खासदारांचे नाव आल्याने तपासाची व्याप्ती वाढणार असून, पैसे देणाऱ्या अन्य व्यक्तींचीही चौकशी होऊ शकते.