छत्रपती संभाजीनगरच्या आकाशवाणी चौकात आणखी एका प्रयोगाने आठ तास वाहतूक खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:12 IST2026-01-10T13:11:30+5:302026-01-10T13:12:01+5:30
सेव्हन हिल, अमरप्रीत चौकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा : अधिकृत सूचनेशिवाय शुक्रवारी निर्णय

छत्रपती संभाजीनगरच्या आकाशवाणी चौकात आणखी एका प्रयोगाने आठ तास वाहतूक खोळंबा
छत्रपती संभाजीनगर : ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता बॅरिकेट काढून आकाशवाणी चौक वाहतुकीसाठी खुला करण्याचा अचानकच आश्चर्यकारक निर्णय घेतला. या निर्णयासाठी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा एकीकडे सुरू असताना, पहिल्याच दिवशी मात्र हजारो शहरवासीयांना या निर्णयामुळे वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी १ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत सेव्हन हिल ते मोंढा नाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
वाहनांची अफाट वाढती संख्या, अतिक्रमणामुळे अरुंद झालेल्या जालना रोडवर वाहतुकीचा प्रश्न गंभीर वळणावर जात आहे. २०१६ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्तांनी ही कोंडी सोडवण्यासाठी सकाळी व सायंकाळी प्रत्येकी तीन तासांसाठी आकाशवाणी व अमरप्रीत चौक बंद करून वाहतूक सरळ सुरू ठेवण्याचा प्रयोग राबवला होता. या प्रयोगामुळे वाहतुकीची कोंडी सुटून सिडको चौक ते क्रांती चौक विना अडथळे वाहने जात होती. त्यानंतर दोन्ही चौक सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. २०१६ या निर्णयानंतर काही व्यापारी, रहिवाशांकडून सातत्याने या निर्णयाला विरोध झाला. आंदोलनही झाले. मात्र, चौक बंद ठेवण्याच्या निर्णयावर पोलिस प्रशासन ठाम राहिले.
... तेव्हा मात्र पोलिस ठाम; मग आता काय?
मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांनी नागरिकांच्या नावे पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेऊन सदर चौक खुला करण्यासाठी निवेदन दिले. त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या नावे ‘पोलिस आयुक्त, तपासून तातडीने कार्यवाही करा’, अशा शिरसाटांनी लिहिलेल्या शेऱ्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या राजकीय दबावातूनच पोलिस प्रशासनाने बॅरिकेट उघडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली.
चौक खुला होताच श्रेयवादासाठी धडपड
प्रभाग क्र. २१ मधून बहुतांश सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आकाशवाणी चौक खुला करण्यासाठी आंदोलन केलेल्यांचाही त्यात समावेश आहे. शुक्रवारी चौक खुला होताच पालकमंत्र्यांनी दुपारी चौकाला भेट देताच त्यांच्या उमेदवारांनी जल्लोष केला. यामुळे विरोधी गटातील उमेदवारांनी अर्ध्या तासाच्या अंतराने भर रस्त्यावर येत फटाके फोडून स्वतंत्र जल्लोष केला. श्रेयवादाच्या या राजकारणामुळे वाहतूककोंडीत भरच पडली.
आता नियोजन काय?
-शुक्रवारी पहिल्याच दिवशी दुपारी १ वाजेपासूनच रात्री उशिरापर्यंत हजारो वाहने जालना रोडवर खोळंबली.
-दुपारी सिडको ते क्रांती चौक व क्रांती चौक ते सिडको या दिशेचे ५० सेकंदांचे सिग्नल सुरू करण्यात आले.
-सायंकाळी ६:३० वाजेनंतर ९० मिनिटांसाठी वाहतूक सुरू ठेवून त्रिमूर्ती चौक, महेशनगरकडील वाहने व पादचाऱ्यांसाठी १ मिनिटांचा सिग्नल ठेवण्यात आला.
-यामुळे मात्र ऐन निवडणुकीत केवळ एका चौकात ६ ते ८ वाहतूक अंमलदार तैनात करण्याची वेळ पोलिसांवर आली.
नोटिफिकेशन नाही
चौक बंद/ सुरू करण्यासाठी वेळोवेळी वाहतूक विभागाकडून अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात येते. शुक्रवारी मात्र विना नोटिफिकेशनच चौक खुला करण्यात आला. त्यामुळे केवळ निवडणुकीपर्यंतच हा निर्णय घेण्यात आल्याची जोरदार चर्चा होती.
आकाशवाणी : प्रयोगांचा चौक
-६ मे २०१६ रोजी सर्वप्रथम सकाळी, सायंकाळी तीन तासांसाठी चौक बंद ठेवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर निर्णय.
-१९ मे २०१६ रोजी ७ दिवसांसाठी पूर्णवेळ प्रयोग.
-१ ऑगस्ट २०१६ रोजी नागरिकांनी बॅरिकेट काढून आंदोलन; मात्र, पोलिसांनी पुन्हा लावले.
-२१ नोव्हेंबर २०२० रोजी पुन्हा प्रत्येकी तीन तासांसाठी चौक बंद ठेवून इतर वेळी खुला ठेवण्याचा प्रयोग.
-२९ नोव्हेंबर २०२० मागणी फेटाळून चौक बंद ठेवण्याचा निर्णय पूर्ववत.
-१३ नोव्हेंबर २०२२ रोजी पुन्हा नागरिकांचे आंदोलन.
-१० जून २०२३ मध्ये आठ दिवसांसाठी बॅरिकेट काढण्याचा प्रयोग.
-१९ जून २०२४ – बॅरिकेट काढण्यासाठी पुन्हा स्थानिकांचे आंदोलन.
-२४ ऑक्टोबर २०२४ रोजी एका अपघातानंतर स्थानिकांकडून आंदोलन करून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न.
नियमनासाठी योग्य बदल करू
नागरिकांची हा चौक उघडण्यासाठी मागणी होती. सातत्याने याबाबत निवेदने देण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. वाहतूक कोंडी न होण्यासाठी आवश्यक नियोजन व बदल केले जातील.
- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त