शाळेतच विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला संतप्त पालकांनी चोपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:25 IST2025-11-25T19:24:21+5:302025-11-25T19:25:18+5:30
गंगापुरातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील प्रकार; पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षकावर गंगापूर पोलिसात पोक्सो व ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेतच विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला संतप्त पालकांनी चोपले
गंगापूर : शहरातील नृसिंह कॉलनीतील ज्ञानप्रबोधिनी शाळेत शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत अल्पवयीन मुलीला नको त्या ठिकाणी स्पर्श करून विनयभंग केल्याच्या घटनेने शहरात संतापाची लाट पसरली. यामुळे संतप्त पालकांनी आरोपी शिक्षकाला बेदम चोप दिला. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो, ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल बलिराम चव्हाण (रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
ज्ञानप्रबोधिनी शाळेतील एक ११ वर्षीय पीडित मुलगी शुक्रवारी (दि. २१) दुपारी दोन वाजता जेवणाच्या सुट्टीत वर्गात एकटी जेवत होती. यावेळी शिक्षक राहुल चव्हाण याने तिच्यासोबत गैरकृत्य केले. पीडित मुलीने घडलेल्या प्रकाराबद्दल आपल्या इतर वर्गमैत्रिणींना सांगितले. तेव्हा त्या शिक्षकाने आपल्यासोबतदेखील असे गैरकृत्य केल्याचे बाकीच्या मुलींनी सांगितले. हा प्रकार पीडितेने शुक्रवारी सायंकाळी आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनी सोमवारी आरोपी शिक्षकाची मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. इतर सहा मुलींसोबतही आरोपीने असे गैरकृत्य केल्याचे उघड झाल्याने पालक वर्गाने संताप व्यक्त करून सोमवारी दुपारी शाळा गाठली व त्या शिक्षकाला चांगला चोप दिला. पोलिसांनी मध्यस्थी करून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले.
यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठा जमाव जमा झाला होता. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करून नागरिकांनी संताप व्यक्त केला. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राहुल चव्हाण याच्याविरोधात गंगापूर पोलिसात सोमवारी सायंकाळी पोक्सो व ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे हे करीत आहेत.