प्रेमप्रकरणातून दीड वर्षांपूर्वी मुलीला पळवून नेल्याचा राग; मुलीच्या आईकडून तरुणाचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 19:44 IST2025-12-15T19:41:24+5:302025-12-15T19:44:10+5:30
पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेतल्याचे कळताच रस्त्यातच सोडून अपहरणकर्ते पसार

प्रेमप्रकरणातून दीड वर्षांपूर्वी मुलीला पळवून नेल्याचा राग; मुलीच्या आईकडून तरुणाचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर : मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या संशयावरून मुलीच्या आईने मुलीचा प्रियकर असलेल्या २३ वर्षीय तरुणाचे भररस्त्यावरून अपहरण केले. त्याला बेदम मारहाणदेखील केली. शनिवारी (दि. १३) दुपारी ४ वाजता सिडको चौकात ही धक्कादायक घटना घडली.
तक्रारदार सुरेश मोहन नरवडे हे सिडको बसस्थानकासमोर नास्त्याची गाडी चालवतात. विशाल आबासाहेब येडके (२३) हा त्यांचा भाचा आहे. विशाल मिसारवाडीत मावशीकडे राहतो. शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सुरेश, विशाल, यश इंगळे, विकी घोरपडेसोबत सिडको बसस्थानक परिसरात नियमित व्यवसाय करत होते.
रस्त्यावर मारहाण; कारमधून अपहरण
कारमधून सुरेश यांच्या परिचयाच्या असलेल्या शांता नावाच्या महिलेसह तिघे उतरले. ‘तूने हमको पहचाना क्या’ असे म्हणत विशालला बेदम मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने कारमध्ये बसवून धमकावत अपहरण करून सुसाट वेगात पसार झाले. सुरेश यांनी तत्काळ एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्याकडे धाव घेतली. येरमे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने, पोलिस उपनिरीक्षक लखनसिंग पचलोरे यांनी पथकासह अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला.
मुलीच्या आईला ताब्यात घेतले
अपहरणकर्त्यांचा शोध सुरू असतानाच पोलिसांनी कुटुंबाकडे जुन्या वादाची पार्श्वभूमी जाणून घेतली. त्यात समजले की, विशालचे दीड वर्षांपूर्वी शांताच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण होते. त्यात विशालने शांताच्या मुलीला पळवून नेले होते. त्याचा राग शांताच्या मनात होता. त्या रागातूनच हे अपहरण झाल्याचा दाट संशय पोलिसांना आला.
शांताबाईला ताब्यात घेतले अन् विशालची सुटका
पोलिसांनी तातडीने शांताचा शोध सुरू केला. पथकाने तिला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. शांताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळताच तीन अपहरणकर्ते घाबरून गेले. त्यानंतर त्यांनी विशालला रस्त्यात सोडून पलायन केले. पण तोपर्यंत त्यांनी विशालला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले होते. विशालने स्थानिकांच्या मदतीने कुटुंबाशी संपर्क साधत पोलिस ठाणे गाठले. घटनाक्रम निश्चित होताच पोलिसांनी शांताला अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली. याप्रकरणी अन्य तीन अपहरणकर्त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले.