'त्या' मुलाच्या आत्महत्येला जुनी मैत्रिण, तिची बहीण, बहिणीचा प्रियकरही जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:46 IST2026-01-01T19:46:00+5:302026-01-01T19:46:06+5:30
सुसाइड नोटमधून माहिती उघड : वीस दिवसांनंतर पाच जणांवर गुन्हा दाखल

'त्या' मुलाच्या आत्महत्येला जुनी मैत्रिण, तिची बहीण, बहिणीचा प्रियकरही जबाबदार
छत्रपती संभाजीनगर : सायबर क्राइमचे क्लासेस करणाऱ्या श्रीकांत उर्फ शक्ती गोरख शिंदे (२२) याने वीस दिवसांपूर्वी गळफास घेत आत्महत्या केली होती. मंगळवारी याप्रकरणी त्याची पूर्वाश्रमीची मैत्रिण, तिची बहीण, बहिणीच्या प्रियकरासह गावातील क्लासेस चालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मूळ कन्नड तालुक्यातील पिशोरचा रहिवासी असलेला श्रीकांत काही महिन्यांपासून शहरात सायबर क्लासेसमध्ये शिकत होता. १० डिसेंबर रोजी त्याने जाधववाडीतील खोलीत रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हा पोलिसांनी त्याच्या खोलीतून सुसाइड नोट जप्त केली होती. त्यात त्याने गावातीलच त्याची भूतपूर्व मैत्रिण, तिची बहीण, बहिणीचा प्रियकर कुलदीप उर्फ तेजस बळीराम निकम (२९), परफेक्ट क्लासचालक सुमिर कुंडलिक पडघान, त्याचा शेजारी गुरुदत्त रासने यांची नावे लिहून त्यांच्या त्रासामुळेच आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. पोलिसांनी ही चिठी जप्त करून कुटुंबाला त्यातील माहिती दिली. दु:खातून सावरल्यानंतर त्याच्या वडिलांनी याप्रकरणी हर्सूल पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक सचिन पागोटे तपास करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीकांत व गावातीलच एका तरुणीची मैत्री होती. मात्र, त्यांच्यात वाद झाल्यानंतर सदर तरुणीने त्याच्यासोबतचा संपर्क कमी करून दुसऱ्या तरुणासोबत मैत्री केली. मात्र, मैत्रिणीचा मित्र, बहीण, बहिणीचा प्रियकर, क्लास चालक सुमित हे सर्व मिळून त्याला त्रास देत होते. त्यातून तणावाखाली त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.
‘तिला अटक करू नका’
आत्महत्येस जबाबदार असल्याचे लिहितानाच श्रीकांतने सुसाइड नोटमध्ये जुन्या मैत्रिणीचा उल्लेख करत ’तिला अटक करू नका, तिला न्यायालयात हजर करू नका’, अशीदेखील विनंती केली.