रस्त्यावर कार लावून बेजबाबदारपणे उघडला दरवाजा, दुचाकीस्वार वृद्धाचा धडकून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 14:57 IST2025-05-23T14:56:10+5:302025-05-23T14:57:07+5:30
भररस्त्यावरच चारचाकी, हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताला निमंत्रण

रस्त्यावर कार लावून बेजबाबदारपणे उघडला दरवाजा, दुचाकीस्वार वृद्धाचा धडकून मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : सावरकर चौकात एका बेजबाबदार कारचालकाने मागचापुढचा विचार न करता थेट कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा अपघातात मृत्यू झाला. ६८ वर्षीय अशोक लक्ष्मीनारायण अमृते हे या अपघातात गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना २१ मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
अशोक पत्नीसमवेत नवजीवन कॉलनीत राहत होते. १९ मे रोजी दुपारी १२:३० वाजता ते आपल्या मित्रासह समर्थनगर भागातील बँकेत गेले होते. काम आटोपून वरद गणेश मंदिराकडून सावरकर चौकाच्या दिशेने जात असताना चौकाच्या अलीकडे एका कारचालकाने (एमएच २० - सीएच - ३४२३) खबरदारी न घेता रस्त्यावरच उभ्या केलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडला. दरवाजा अचानक उघडल्याने मागून येत असलेल्या अशोक यांची दुचाकी थेट दरवाजावर जाऊन आदळली. या धडकेत ते रस्त्यावर कोसळून डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
घाटीत मृत्यूशी झुंज अपयशी
अपघातानंतर कारचालक व स्थानिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान २१ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. अशोक अमृते हे बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांची मुलगी परदेशात राहते. या घटनेनंतर अशोक यांचे पुतणे प्राध्यापक मनिष अमृते यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास अधिकारी उपनिरीक्षक रमेश कंदे यांनी तपास करून चालक भोवनेश्वर रामदास पाटील (रा. बजाजनगर) हे असल्याचे निष्पन्न केले.
रस्त्यावरच पार्किंगचा विळखा
समर्थनगरमध्ये भररस्त्यावरच चारचाकी, हातगाड्या उभ्या केल्या जातात. वरद गणेश मंदिर ते सावरकर चौक रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावर बँक, शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉटेल, मेडिकल आहेत. मात्र, अनेक ठिकाणी गाड्यांसाठी जागा नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावर गाड्या उभ्या करतात. यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते. शिवाय, अपघातदेखील होत आहे. मात्र, मनपा, वाहतूक पोलिस याकडे साफ दुर्लक्ष करते.