दारू, चाकू आणि गुन्हेगाराचा शिरसाटांच्या घरात घुसण्याच्या प्रयत्न; पोलीसांचा निष्कर्ष काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:18 IST2025-07-25T12:17:11+5:302025-07-25T12:18:29+5:30
सौरभ भोलेच्या नाट्यमय प्रवेशाने खळबळ; गुन्हेगार असल्याने प्रकरणाला मिळाले गंभीर वळण

दारू, चाकू आणि गुन्हेगाराचा शिरसाटांच्या घरात घुसण्याच्या प्रयत्न; पोलीसांचा निष्कर्ष काय?
छत्रपती संभाजीनगर : हाणामारी, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी सौरभ अनिल भोले (२४, रा. समतानगर, क्रांती चौक) याने पोलिस सुरक्षा भेदून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार केवळ दारूच्या नशेत झाला असून, त्याचा अन्य उद्देश नव्हता, अशा निष्कर्षावर पोलिस पोहोचले आहेत. गुरुवारी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
२० जुलै रोजी रात्री ११ वाजता शिरसाट घरी पोहोचले असता, त्यांचा ताफा घरात जात असताना सौरभने ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा ताफ्यातील पोलिसांना अरेरावी करत धक्काबुक्की केली. वैद्यकीय तपासणीत तो दारू प्यायल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कलम ८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली. सोमवारी दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी कलमांमध्ये वाढ करत अटक करण्यात आली. तेव्हा न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
का मिळाले गंभीर वळण
पालकमंत्री संजय शिरसाट हे अतिमहत्त्वाचे व्यक्ती असून, विनाक्रमांकाच्या दुचाकीसह सौरभ ताफ्यात घुसून बंगल्याकडे वळला. त्याच्या दुचाकीत चाकू देखील सापडला. या कृत्याआधी तो हर्सूल कारागृहातून नुकतेच जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांसोबत दुपारपासून पार्टी करत होता. शिवाय, शिरसाट यांनी स्वत: तो खुनातील आरोपी असल्याने, त्यांच्यावर हल्ल्याचा देखील हा कट असल्याचा संशय व्यक्त केला. परिणामी, या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले.
पडेगावला जायचा रस्ताच कळला नाही
३०-३० घोटाळ्यातील आरोपी पंकज जाधव नुकताच जामिनावर सुटला. सौरभची त्याची कारागृहात मैत्री झाल्याने, अन्य मित्रांसोबत त्यांनी दुपारपासून पार्टी केली. रात्री तो पंकजच्या घरी पोहोचला. पंकजचे घर त्याच परिसरात आहे. तेथून दुचाकीने पडेगावच्या दिशेने निघाला. मात्र, नशेत त्याला रस्ताच कळला नाही. शिरसाट यांचा ताफा निघाल्यानंतर, त्याला तो पुढे रस्ताच असल्याचे वाटल्याने तो थेट ताफ्यात घुसल्याचा निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत.