विद्युत बिघाडानंतर आता पाईपलाईन फुटली, छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:37 IST2025-07-16T14:36:37+5:302025-07-16T14:37:17+5:30
सलग दोन दिवसांतील या घटनांमुळे शहरवासीयांना पुढील काही दिवस पाणीपुरवठ्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

विद्युत बिघाडानंतर आता पाईपलाईन फुटली, छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत
छत्रपती संभाजीनगर: चितेगाव परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना बुधवारी सकाळी ९.४५ वाजता व्हिडिओकॉन कंपनीसमोर जमिनीखालील मुख्य जलवाहिनी पोकलेन मशीनमुळे फुटली. १२०० मिमी व्यासाची ही पाईपलाईन छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख लाईनपैकी एक असून, फुटीमुळे जवळपास ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले. यामुळे त्या परिसरात गोंधळ उडाला असून, मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली.
या अपघातामुळे शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच सोमवारी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात दुपारी ३:३० वाजता महावितरणच्या ३३ केव्ही लाईनवरील दोन कंडक्टर आणि पिन इन्सुलेटर तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी, जायकवाडी येथील पंप बंद पडले आणि संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुमारे सहा तास ठप्प झाला. रात्री ८ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला. मात्र पंपिंग पुन्हा सुरू करण्यासाठी वेळ लागल्याने पाणी शहरात रात्री १० वाजता पोहोचले. परिणामी, अनेक वसाहतींना नियोजित वेळेपेक्षा उशिराने किंवा दुसऱ्या दिवशी पाणी मिळाले.
दरम्यान, दोन ते तीन आठवडे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. मात्र, सलग दोन दिवसांतील या घटनांमुळे शहरवासीयांना पुढील काही दिवस पाणीपुरवठ्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.