पाडसवान यांच्या हत्येनंतर हल्लेखोर रुग्णालयात म्हणाले, किती जण मेले? बाकी दोघे कसे वाचले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:22 IST2025-08-25T13:21:04+5:302025-08-25T13:22:03+5:30

प्रमोद पाडसवान हत्या प्रकरण: हल्ल्याच्यावेळी आरोपींच्या कंबरेला होते पिस्तूल; न्यायालयात आरोपींची मुजोरी कायम, चेहऱ्यावर हसू

After the killing of Pramod Padaswan, the attackers said in the hospital, "How many people died? How did the other two survive?" | पाडसवान यांच्या हत्येनंतर हल्लेखोर रुग्णालयात म्हणाले, किती जण मेले? बाकी दोघे कसे वाचले?

पाडसवान यांच्या हत्येनंतर हल्लेखोर रुग्णालयात म्हणाले, किती जण मेले? बाकी दोघे कसे वाचले?

छत्रपती संभाजीनगर : संभाजी कॉलनीत प्रमोद पाडसवान यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर निमोने भावांनी स्वत:वर वार करत रुग्णालयात दाखल होण्याचे नाटक केले. त्याच वेळी प्रमोद यांचे वडील व मुलावर तेथेच उपचार सुरू होते. त्यांना पाहून निमोने भावांनी ‘किती जण मेले, तपासून घ्या, इतर दोघे कसे वाचले? बाहेर आल्यावर त्यांनाही मारू’, असे म्हणत मुजोरपणाची हद्द गाठली. घटनेच्या वेळी त्यांच्या कंबरेला गावठी कट्टे होते. त्यांना रुग्णालयात काही राजकीय पदाधिकाऱ्यांचे काॅलही आल्याचा गंभीर आरोप पाडसवान कुटुंबाने केला.

प्रमोद यांच्या हत्येचा आक्रोश, संताप रविवारीही कायम होता. हत्येवेळी त्यांच्या कंबरेला पिस्तूल पाहिल्याचा दावा रुद्राक्षने केला. अनेक दिवसांपासून ते खुनाच्या धमक्या देत होते. त्यामुळे ही हत्या पूर्वनियोजित, राजकीय किनारीची असल्याचा दावा पाडसवान कुटुंबाने केला.

पोलिसांनाही आश्चर्य
रविवारी निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक जगन्नाथ मेंदकुदळे यांनी आरोपी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने, त्याची आई शशिकला व लहान भाऊ गौरवला न्यायालयात हजर केले. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने तिघांनाही ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यादरम्यान ज्ञानेश्वरच्या चेहऱ्यावर मुजोरी कायम होती. चेहऱ्यावर हसू होते. त्याला भेटायला गेलेल्या बहिणीला तो हसून ’टेन्शन घेऊ नको, काही होत नसते’, असे म्हणत होता. त्याची ही देहबोली पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटले.

नेत्यांची रीघ, नातेवाइकांचा संताप
रविवारी पालकमंत्री संजय शिरसाट, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. संदिपान भुमरे, माजी खा. चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील यांनी पाडसवान कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. पोलिस असताना अशी गुन्हेगारी, गुंडगिरी चालत असेल, तर आम्ही येथे राहायचे की नाही, असा संतप्त सवाल करत महिलांनी शिरसाट यांना घेराव घातला.

निमोनेंची संपत्ती जप्त करा
निमोने गेल्या काही वर्षांत वाळू, पाण्याच्या टँकर व्यवसायात उतरले होते. पाडसवान यांनी बांधकामासाठी नेमलेल्या ठेकेदारालाही त्यांनी धमकावले. बोअरवाल्याला परतवून लावले. अनेकदा आमच्यावर मिरचीचे पाणी फेकले. त्यांची संपत्ती जप्त करा, अशी मागणी स्थानिकांनी केली.

एकाचा धिंगाणा, पोलिसांनी घेतले ताब्यात
शिरसाट यांच्या भेटीत पडसवान कुटुंबाने निमोने कुटुंबाला पाठबळ देणाऱ्या परिसरातील व्यक्तींची नावे सांगितली. ही बाब कळताच शिरसाट जाताच अरुण नामक तरुणाच्या वडिलांनी मुलाचे नाव घेतल्याच्या कारणावरून पडसवान यांच्या घरासमोर जात अरेरावी करत धिंगाणा घातला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर तेथे बंदोबस्त वाढवण्यात आला.

Web Title: After the killing of Pramod Padaswan, the attackers said in the hospital, "How many people died? How did the other two survive?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.